नवजात शिशूचे नाव धर्मशास्त्रानुसार ठेवा !
बोधप्रद ज्योतिष लेखमाला
‘हिंदु धर्मात सांगितलेल्या प्रमुख सोळा संस्कारांपैकी ‘नामकरण’ हा ५ वा संस्कार आहे. नवजात शिशूचा जन्म झाल्यानंतर १२ व्या किंवा १३ व्या दिवशी त्याचा नामकरण संस्कार करतात. ‘बाळातील बीजदोष आणि जन्मजात दोष नाहीसे व्हावेत, त्याचे आयुष्य वाढावे अन् जगात त्याला व्यवहार करणे सोपे जावे’, यासाठी नामकरण संस्कार केला जातो. धर्मशास्त्रात सांगितलेले नवजात शिशूचे नाव ठेवण्याचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.
लेखांक १
१. नवजात शिशूचे नाव ठेवण्याचे प्रकार
धर्मशास्त्रात नवजात शिशूचे नाव ठेवण्याचे ४ प्रकार सांगितले आहेत. देवता, मास, नक्षत्र आणि व्यवहार यांसंबंधी असे हे ४ प्रकार आहेत. त्यांची माहिती पुढे दिली आहे.
१ अ. देवतेसंबंधी नाव : हे नाव ठेवतांना घराण्याची जी कुलदेवता असेल, तिच्या नावापुढे दास, शरण इत्यादी उपपदे लावून हे देवतानाम ठेवतात. उदा. दुर्गादास, अंबादास इत्यादी.
१ आ. मासासंबंधी नाव : ज्या चांद्रमासात (मराठी मासात) शिशूचा जन्म होतो, त्या मासाशी संबंधित नाव ठेवले जाते. चैत्रादी १२ मास आणि त्यांच्याशी संबंधित मुलांची अन् मुलींची नावे पुढील सारणीत दिली आहेत –
१ इ. नक्षत्रासंबंधी नाव : ज्या नक्षत्रात शिशूचा जन्म झाला असेल, त्या नक्षत्राशी संबंधित नाव ठेवले जाते. नक्षत्रावरून नाव ठेवण्याचे पुढील २ प्रकार आहेत –
१ इ १. नक्षत्राच्या नावाला प्रत्यय लावून नाव ठेवणे : नक्षत्राच्या नावाला संस्कृत भाषेनुसार ‘जातः’ (जन्मलेला) या अर्थी तद्धित प्रत्यय लावून नक्षत्रनाम ठेवले जाते, उदा. कृत्तिका वरून कार्तिक, रोहिणी वरून रौहिण इत्यादी. कन्येचे नक्षत्रनाम ठेवतांना नक्षत्राचे जसे नाव आहे, तसेच ठेवतात. उदा. कृत्तिका, रोहिणी इत्यादी.
१ इ २. नक्षत्राच्या चरणाक्षरावरून नाव ठेवणे : प्रत्येक नक्षत्राचे ४ पाद म्हणजे ४ चरण आहेत. नक्षत्राच्या प्रत्येक चरणाला विशिष्ट अक्षर दिलेले आहे, उदा. अश्विनी नक्षत्राच्या ४ चरणांना अनुक्रमे ‘चू, चे, चो, ला’ ही अक्षरे आहेत. बाळाचा जन्म नक्षत्रातील ज्या चरणात झाला असेल, त्या चरणाच्या अक्षरावरून नक्षत्रनाम ठेवले जाते, उदा. अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणावर जन्म असल्यास ‘चू’ अक्षरावरून ‘चूडेश्वर’ इत्यादी नाव ठेवले जाते.
१ ई. व्यवहारासंबंधी नाव : हे नाव व्यवहारात वापरण्यासाठी ठेवले जाते. यासंबंधी शास्त्राने पुढील नियम सांगितले आहेत – ‘व्यावहारिक नावात कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग आणि पवर्ग यांच्यातील तिसरा, चवथा अन् पाचवा वर्ण (ग, घ, ङ, ज, झ, ञ, ड, ढ, ण, द, ध, न, ब, भ, म) आणि ‘ह’ यांपैकी कोणताही वर्ण नावाच्या आरंभी असावा. नावाच्या मध्यभागी अंतस्थ वर्ण (य, र, ल किंवा व) असावा. पुत्राच्या नावातील अक्षरांची संख्या सम (२, ४ इत्यादी) असावी आणि नाव अकारान्त असावे, उदा. जय, नीलकंठ, देवव्रत, भालचंद्र, गिरीधर इत्यादी. कन्येच्या नावातील अक्षरांची संख्या विषम (३, ५ इत्यादी) असावी आणि नाव आकारान्त किंवा ईकारान्त असावे, उदा. गायत्री, नलिनी, जान्हवी, देवश्री इत्यादी.’ (संदर्भ : ‘धर्मसिंधु’)
१ ई १. व्यवहारासंबंधी नाव ठेवण्यासाठी सांगितलेल्या नियमांमागील शास्त्र : ‘कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग आणि पवर्ग यांच्यातील पहिला अन् दुसरा वर्ण (क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ) हे पृथ्वी, तसेच आप तत्त्वप्रधान असल्याने तमोगुणी आहेत. त्यामुळे हे वर्ण नावाच्या आरंभी असू नयेत. पुत्राचे नाव सम आणि कन्येचे नाव विषम अक्षरसंख्येचे असावे; कारण सम संख्या शिवप्रधान आणि विषम संख्या शक्तीप्रधान आहे.’
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सोळा संस्कार’)
२. नाव अर्थपूर्ण आणि सात्त्विक असावे
व्यावहारिक नाव ठेवतांना ते अर्थपूर्ण, सात्त्विक आणि उच्चारण्यास सुलभ असावे. देवता, पौराणिक व्यक्ती, धर्मपरायण राजे, नक्षत्र, निसर्ग, विद्या, बुद्धी, तेज, सौंदर्य, बल, वृद्धी इत्यादींशी संबंधित नावे ठेवावीत, उदा. नारायण, सत्यवान, दशरथ, दयानंद, ज्ञानेश्वर, अश्विनी, उत्तरा, गिरिजा, मंजिरी, मैथिली इत्यादी. अर्थहीन नावे (उदा. बंडू, पिंटू, मोनू इत्यादी) आणि विदेशी भाषेतील नावे (पिंकी, बेबी, डॉली इत्यादी) ठेवू नयेत. संस्कृत भाषा देववाणी असल्यामुळे सात्त्विकतेचा लाभ होण्यासाठी संस्कृतप्रचुर नावे ठेवावीत.
३. धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार नाव का ठेवावे ?
धर्माने मनुष्याच्या सर्वांगीण म्हणजे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक उन्नतीचा विचार करून त्याच्यासाठी जीवनपद्धत ठरवून दिली आहे. याउलट आधुनिक विज्ञान केवळ आधिभौतिक अंगाचा विचार करते. व्यक्तीला ठेवलेल्या नावाचा उपयोग केवळ व्यवहार करणे सुलभ जावे एवढाच मर्यादित नाही. प्रत्येक अक्षरात विशिष्ट शक्ती ही बीजरूपात समाविष्ट असते. व्यक्तीच्या नावाचा तिच्यावर आधिदैविक स्तरावर (सूक्ष्म-ऊर्जेच्या स्तरावर) आणि आध्यात्मिक स्तरावर (जीवात्म्याच्या स्तरावर) परिणाम होतो. त्यामुळे ‘कोणती अक्षरे नावाच्या आरंभी असावी, मध्यभागी असावी, कोणती अक्षरे नावात असू नयेत, स्त्री आणि पुरुष यांच्या नावात किती अक्षरे असावी ?’, इत्यादी गोष्टींचा सखोल विचार धर्मशास्त्रात केला आहे. याचे महत्त्व लक्षात घेऊन पालकांनी त्यांच्या पाल्याचे नाव धर्मशास्त्रानुसार ठेवण्याचा प्रयत्न करावा.’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.१०.२०२२)
संपादकीय भूमिकानवजात शिशूच्या नावासंबंधी ऋषिमुनींनी सखोल विचार केला असल्याने यावरून हिंदु धर्माची महानता लक्षात येते ! |