हिंदु धर्मग्रंथातील सूत्रे प्राचीन असूनही काळाच्या कसोटीवर सत्यात उतरणारी असणे, याची साधिकेला आलेली प्रचीती !
‘२३.९.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील पृष्ठ क्र. ५ वरील १४.९.२०१९ या दिवशी भृगु महर्षींच्या सांगण्यावरून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे केलेल्या पितृपूजनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !’ या लेखातील भगवान श्रीविष्णु, सूर्यकिरण आणि पितृकलशाच्या संदर्भातील लिखाण वाचल्यावर माझ्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्रीगरुडपुराणातील ‘प्रेतकल्प’ या भागात गरुड आणि भगवान श्रीविष्णु यांच्या संवादात गरुडाने श्रीविष्णूला अनेक प्रश्न विचारणे : श्रीगरुडपुराणातील ‘प्रेतकल्प’ या भागात गरुड आणि भगवान श्रीविष्णु यांचा संवाद आहे. त्यामध्ये माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे श्राद्धविधी आणि त्या अनुषंगाने इतर अन्य कर्मांसंबंधी गरुड भगवान श्रीविष्णूला अनेक प्रश्न विचारतो.
२. गरुडाने भगवान श्रीविष्णूला विचारलेला प्रश्न आणि श्रीविष्णूंनी त्याचे दिलेले उत्तर ! : गरुड भगवान श्रीविष्णूला विचारतो, ‘हे स्वामी, मृत व्यक्तीच्या नावाने जे दान दिले जाते, ते गेलेल्या जिवाला कसे पोचते आणि ते कोण घेते ?’ त्यावर भगवान श्रीविष्णु सांगतात, ‘ते दान वरुणदेव घेतो आणि मला देतो. मी ते सूर्यनारायणाला देतो आणि सूर्यनारायण ते त्या प्रेताला देतो. (संदर्भ : गरुडपुराण, धर्मकाण्ड, प्रेतकल्प, अध्याय १८, श्लोक २६ आणि २७)
३. कु. मधुरा भोसले यांनी केलेल्या सूक्ष्म परीक्षणातील सूत्रे ‘श्रीगरुडपुराणा’नुसार सत्य असल्याचे लक्षात येणे : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वरील लेखात कु. मधुरा भोसले हिच्या सूक्ष्म परीक्षणात आलेली पुढील सूत्रे श्रीगरुडपुराणातील ‘प्रेतकल्पा’नुसार सत्य असल्याचे लक्षात आले.
३ अ. पितरांचे शुद्धीकरण करण्यासाठी कलशावर सूर्यकिरण पडणे आणि पितरांच्या लिंगदेहांची शुद्धी होणे : पितरांना गती देण्यासाठी विष्णुलोकातील श्रीविष्णुतत्त्वाच्या लहरी सूर्यकिरणांच्या माध्यमातून पृथ्वीवर आल्या. आपतत्त्व प्रबळ असणारे कनिष्ठ स्तरावरील पितर पितरांसाठी ठेवलेल्या कलशातील जलाकडे; म्हणजेच वरुणदेवाकडे आकृष्ट झाले होते आणि वायुतत्त्व प्रबळ असणारे वरिष्ठ स्तरावरील पितर कलशाच्या पोकळीमध्ये आकृष्ट झाले होते. या पितरांचे शुद्धीकरण करण्यासाठी कलशावर सूर्यकिरण पडले. त्यामुळे पितरांच्या लिंगदेहांची शुद्धी झाली.
३ आ. पुरुषसूक्ताच्या वेळी सूर्यकिरण पितृकलशावर पडणे आणि पितरांना गती अन् मुक्ती देण्यासाठी श्रीविष्णूचे तत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवणे : त्याचप्रमाणे सनातनचे दिवंगत उन्नत साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्या लिंगदेहांची तेजोमय स्पंदने सूर्यकिरणांमध्ये मिसळून ती पितरांसाठी ठेवलेल्या कलशामध्ये आकृष्ट झाली. पुरुषसूक्ताच्या वेळी सूर्यकिरण पितृकलशावर पडले, तेव्हा पितरांना गती आणि मुक्ती देण्यासाठी श्रीविष्णूचे तत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवले.
३ इ. यावरून ‘हिंदु धर्मातील सगळेच धर्मग्रंथ, आचार, विचार, संस्कार, सण, व्रते उत्सव आणि इतरही जे जे काही हिंदु धर्मामध्ये सांगितले आहे, ते कितीही प्राचीन असले, तरीही ते काळाच्या कसोटीवर सत्यात उतरणारे आहे’, हे लक्षात आले.
‘हे श्रीगुरुमाऊली, सर्व प्रकारचे माया, मोह आणि अज्ञान यांतून हिंदु धर्म अन् हिंदुत्व यांना कलीच्या प्रभावाने अज्ञानाच्या भयाण अंधारात चाचपडणार्या आम्हा हिंदूंना आपणच या ज्ञानाच्या माध्यमातून प्रकाशाची वाट दाखवत आहात. आमच्या हाताला धरून चालवत आहात. आपणच आमचा आधार आहात; म्हणून देवांनाही दुर्लभ असणार्या आपल्या परम पावन चरणी आम्ही सर्व कर्महिंदू कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्रीगुरुचरणी शरणागत,
श्रीमती कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.९.२०२१)
|