चंद्रग्रहणाचा वनस्पतीवर (तुळशीवर) झालेला परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

तुळशीचे रोप

‘३१.१.२०१८ या दिवशी चंद्रग्रहण होते. हे ग्रहण भारतात सर्वत्र ‘खग्रास’ दिसणारे ग्रहण होते. ‘ग्रहणाचा वनस्पतीवर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी त्या दिवशी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ही चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

सौ. मधुरा धनंजय कर्वे

या चाचणीत एका साधिकेच्या घरातील तुळशीच्या ग्रहणारंभापूर्वी, ग्रहणारंभानंतर, ग्रहणमध्यानंतर आणि ग्रहणमोक्षानंतर अशा एकूण ४ टप्प्यांवर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

१ अ. ग्रहणारंभापूर्वी तुळशीमध्ये सकारात्मक ऊर्जा असणे, ग्रहणारंभानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत थोडी घट होणे आणि

ग्रहणमोक्षानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुन्हा वाढ होणे : तुळशीमध्ये ग्रहणापूर्वी आणि नंतरही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. ग्रहणारंभापूर्वी तुळशीमध्ये सकारात्मक ऊर्जा होती. ग्रहणारंभानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत थोडी घट झाली. ग्रहणमध्यानंतर तुळशीतील सकारात्मक ऊर्जा तेवढीच राहिली आणि ग्रहणमोक्षानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुन्हा वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

टीप – तुळशीच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’ने ९० अंशाचा कोन केला. ‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. ग्रहणकालावधीत अनिष्ट शक्तींमुळे दूषित झालेल्या वातावरणाची शुद्धी होण्यासाठी तुळशीतील सकारात्मक ऊर्जा उपयोगात आणली जाणे : ग्रहणारंभ झाल्यावर अनिष्ट शक्तींना वातावरण पोषक बनल्याने त्यांचा संचार वाढतो. त्यांच्याकडून वातावरणात त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण होत असल्याने वातावरण दूषित बनते. त्यामुळे ग्रहणकाळात अन्नपदार्थ, वनस्पती, पशू-पक्षी, मानव आदींवर नकारात्मक स्पंदनांचा परिणाम होऊ शकतो. तुळस ही मुळातच सात्त्विक वनस्पती आहे. वातावरणाची शुद्धी करणे, हे तिचे निसर्गदत्त कार्य आहे. चाचणीतील तुळशीमध्ये ग्रहणापूर्वी नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सकारात्मक ऊर्जा होती. एरव्हीच्या तुलनेत ग्रहणकाळात वातावरण अधिक दूषित होत असल्याने त्या कालावधीत तुळशीतील सकारात्मक ऊर्जा वातावरणशुद्धीसाठी उपयोगात आणली गेली. त्यामुळे ग्रहणारंभ आणि ग्रहणमध्यानंतर तुळशीतील सकारात्मक ऊर्जा थोडी न्यून झाल्याचे दिसून आले. ग्रहणमोक्षानंतर अनिष्ट शक्तींना वातावरण अनुकूल न राहिल्यामुळे त्यांचा जोर न्यून झाला. त्यामुळे ग्रहणमोक्षानंतर तुळशीतील सकारात्मक ऊर्जा व्यय होण्याचे प्रमाण उणावले. त्यामुळे तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. या प्रयोगातून ‘भगवंत तुळशीसारख्या सात्त्विक वनस्पतीच्या माध्यमातून ग्रहणकाळातील दूषित वातावरणापासून मानवाचे कसे रक्षण करतो’, हे लक्षात येते. त्यामुळे मानवाने तुळशीप्रती, तसेच भगवंताप्रती सदैव कृतज्ञ रहायला हवे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.२.२०१८)

ई-मेल : mav.research2014@gmail.com