शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांना हुतात्म्याचा दर्जा द्यावा ! – सूरी यांच्या मुलाची मागणी

मागणी मान्य न झाल्यास पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची चेतावणी !

शिवसेना नेते सुधीर सुरी (डावीकडे ), यांचा मुलगा माणिक सुरी (उजवीकडे )

अमृतसर (पंजाब) – येथे ४ नोव्हेंबर या दिवशी एका खलिस्तान्याकडून शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या मुलाने सूरी यांना ‘वीरगतीला प्राप्त’ (हुतात्मा) असा दर्जा देण्याची मागणी सरकारकडे केली. ‘ही मागणी मान्य केली नाही, तर सूरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही’, अशी चेतावणीही त्यांनी दिली. सुधीर सूरी हे वर्ष २०१६ पासून खलिस्तान्यांच्या निशान्यावर होते. २३ ऑक्टोबर या दिवशी पोलिसांनी ४ गुंडांना अटक केली होती. ते सूरी यांना दिवाळीपूर्वी ठार करणार होते. त्यानंतर सूरी यांना पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते. असे असतांनाही त्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली.

१. सूरी यांची हत्या करणारा संदीप सिंह उपाख्य सनी याला पोलिसांनी अटक केली आहे. तो ‘वारिस पंजाब दे’ या शीख संघटनेचा सदस्य आहे. या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह आणि अन्य नेत्यांची संदीप याने नुकतीच भेट घेतली होती. संदीप याने चौकशीत मात्र त्याने ‘कुणाच्या सांगण्यावरून सूरी यांच्या हत्या केलेली नाही’, असे सांगितले.

२. याविषयी पोलीस महासंचालक गौरव यादव म्हणाले की, या हत्येच्या मागे अमृतपाल सिंह यांचा संबंध आहे कि नाही ?, हे आताच सांगू शकत नाही; मात्र आम्ही सर्व दृष्टीने या घटनेची चौकशी करत आहोत.

सूरी यांच्यानंतर पंजाबमधील अन्य हिंदु नेत्यांचा क्रमांक ! – पाकमधील खलिस्तान समर्थक गोपाल चावलाची धमकी

सुधीर सूरी यांच्या हत्येनंतर पाकिस्तानमधील खलिस्तान समर्थक नेता गोपाल चावला याने त्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. यात तो सूरी यांची हत्या करणार्‍याला शाबासकी देत ‘ज्या शीख तरुणाने ही हत्या केली, त्याच्यासाठी मी माझा जीव ओवाळून टाकू शकतो. याप्रमाणे पंजाबमधील अन्य हिंदु नेतेही लक्ष्य असून त्यांचाही क्रमांक लागणार आहे’, अशी धमकी दिली. गोपाल चावला हा जिहादी आतंकवादी हाफीज सईद याच्या जवळचा मानला जातो. वर्ष २०१८ मध्ये अमृतसरमध्ये झालेल्या ग्रेनेड आक्रमणात त्याचा सहभाग असल्याचे समोर आले होते.