सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरात कचरा टाकणार्या पुणे महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधीवर आली क्षमा मागण्याची वेळ !
नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी नियम दाखवल्याने लोकप्रतिनिधीने रागावून केले उद्धट वर्तन !
सावंतवाडी – गोवा येथून पुणे येथे जात असतांना सावंतवाडी शहरातील जिमखाना परिसरात पुणे नगरपालिकेच्या एका लोकप्रतिनिधीने कचरा टाकला. याविषयी हटकल्याने राग आलेल्या त्या लोकप्रतिनिधीने नगरपरिषदेच्या कर्मचार्याशी उद्धट वर्तन केले अन् पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले; मात्र कर्तव्यदक्ष कर्मचार्याने कार्यालयीन वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने त्याला पोलीस ठाण्यात येण्यास भाग पाडले. ‘तुमच्याकडून चूक झाली आहे. त्यामुळे गुन्हा नोंद करू’, अशी चेतावणी अधिकार्यांनी देताच त्या लोकप्रतिनिधीने अखेर क्षमा मागितली. त्यामुळे २ सहस्र रुपये दंड आकारून पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
गोवा येथे फिरण्यासाठी गेलेल्या पुणे महानगरपालिकेतील त्या लोकप्रतिनिधीसह त्याच्या सहकार्याने परतीच्या प्रवासात सावंतवाडी शहरातील जिमखाना परिसरात स्वत:कडील कचरा फेकला. या वेळी तेथे कार्यरत असलेल्या नगरपरिषदेच्या आरोग्य कर्मचार्यांनी त्यांना रोखले आणि कचरा टाकल्यामुळे दंड भरावा लागेल, अशी सूचना केली. या वेळी तो लोकप्रतिनिधी, ‘माझे काय ते करून घ्या. मी लोकप्रतिनिधी आहे’, असे उद्धटपणे सांगून चारचाकीसह मार्गस्थ झाला. ही घटना त्या आरोग्य कर्मचार्याने नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांना सांगितली. नाटेकर यांनी तात्काळ याविषयी आंबोली पोलीस दूरक्षेत्राला माहिती दिली. त्यानुसार त्या लोकप्रतिनिधीची चारचाकी आंबोली पोलीस दूरक्षेत्राकडे येताच पोलिसांनी त्यांना पुन्हा सावंतवाडी पोलीस ठाण्यात पाठवून दिले. हा लोकप्रतिनिधी आणि त्याचे सहकारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आल्यानंतर तेथे नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक नाटेकर आणि आरोग्य अधिकारी रसिका नाडकर्णी यांनी संबंधितांना चांगलेच खडसावले. ‘झालेला प्रकार चुकीचा असून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करू’, अशी चेतावणी दिली. चेतावणी देताच, ‘माझ्याकडून झालेला प्रकार चुकीचा आहे. यापुढे असा प्रकार होणार नाही. मला क्षमा करा’, अशी विनंती करत क्षमा मागितली. अखेर २ सहस्र रुपये दंड आकारून त्यांना सोडण्यात आले.
संपादकीय भूमिकाज्याला ‘कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये’ हे समजत नाही, तो महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी होण्यास पात्र आहे का ? |