घोडेगाव (पुणे) येथे उत्कृष्ट उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा !
|
आंबेगाव (जिल्हा पुणे), ४ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील युवा उद्योजक, ‘जे.के. ग्रुप’चे संस्थापक, तसेच व्यापार आघाडीचे अध्यक्ष श्री. जयेशभाऊ काळे पाटील यांच्या २७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट उद्योजकाचा सन्मान सोहळा नुकताच घोडेगाव येथील ‘अमित गेस्ट हाऊस’मधील मंगल कार्यालयात साजरा झाला. या प्रसंगी ‘जे.के. ग्रुप समूह’, तसेच जयेशभाऊ मित्र परिवार यांच्या वतीने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देण्यात आल्या. भविष्यात नवनवीन उद्योग चालू करून, ते उद्योग प्रगतीपथावर पुढे घेऊन जाणार्या उत्कृष्ट उद्योजकांना प्रेरणा मिळावी, यासाठी ‘ट्रॉफी’ देऊन जयेशभाऊ काळे यांचा पाहुणे आणि मान्यवर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पुणे जिल्ह्यातील १०० उद्योजकांचाही सन्मान करण्यात आला.
या वेळी पुणे येथील उद्योजक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, तसेच सूत्रसंचालन ओंकार घुले यांनी केले. गिरवली गावचे युवा नेते सचिन भाऊ सैद यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. या प्रसंगी शारदा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. पांडुरंग महाराज येवले, पंचायत समितीचे माजी सभापती सखाराम घोडेकर, ‘समर्थ भारत न्यूज’चे संपादक समीरभाई पठाण, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक यशराज काळे, ‘न्यू इंग्लीश मिडियम स्कूल’चे माजी अध्यक्ष अधिवक्ता संजय आर्विकर, प्रसिद्ध ‘विकास फोटो ग्राफ्री’चे मालक ज्येष्ठ पत्रकार विकास गाडे, उद्योजक उदय शहा, अनुसया पतसंस्थेच्या संचालिका ज्योतीताई घोडेकर, यशवंत काळे, काळेवाडी दरेकर वाडीचे ग्रामपंचायत सदस्य जयश्रीताई काळे, उद्योजक अभिजित दरेकर, अभिजित कुदळे, अशय घोडेकर, किरणशेठ पोखरकर यांसह मान्यवर, तसेच ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.