जळगाव येथील श्रीराम रथोत्सव भक्तीमय वातावरणात पार पडला !
जळगाव, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – वर्ष १८७१ मध्ये संत आप्पा महाराज यांनी जळगावचे ग्रामदैवत प्रभु श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुढील वर्षी म्हणजेच वर्ष १८७२ च्या कार्तिक शुक्ल एकादशीपासून जळगावनगरीत श्रीराम रथोत्सवाला प्रारंभ केला. यंदा या रथोत्सव परंपरेला १४९ वर्षे पूर्ण होत आहेत. कार्तिक शुक्ल प्रतिपदा ते दशमीपर्यंत प्रतिदिन १२ वाहने सिद्ध करण्यात आली. यांतील ११ वाहने म्हणजे अश्व, ऐरावत, व्याघ्र, शार्दूल, गजेंद्रमोक्ष, सरस्वती, शेषनाग, चंद्र, सूर्य, गरुडराज आणि मारुतीराय अशी आहेत. कार्तिक शुक्ल एकादशीस, म्हणजेच ४ नोव्हेंबर या दिवशी टाळ-मृदुंग, सनई-चौघडा आणि रामनामाचा गजर यांमुळे श्रीराम रथोत्सव भक्तीमय वातावरणात पार पडला. ५ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल द्वादशीस श्रीकृष्णाच्या रासक्रीडेच्या वाहनाने महोत्सवाची सांगता होईल.
श्रीराम मंदिर – कोल्हेवाडा – आंबेडकर नगर – चौधरी वाडा – घाणेकर चौक – महालक्ष्मी मंदिर – सुभाष चौक – दाणा बाजार असा रथाचा मार्ग असेल.
संत आप्पा महाराज, वासुदेव महाराज, केशव महाराज, बाळकृष्ण महाराज, विद्यमान गादिपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी हे श्रीराम मंदिराचे गादिपती आहेत.
क्षणचित्रे
१. दोन अश्व आणि त्यांचे सारथ्य साक्षात् भगवंत करत असलेला रथ फुलांच्या माळांनी सुशोभित केलेला होता.
२. रथमार्गावर काढलेल्या रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
३. ठिकठिकाणी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.