वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड तालुका करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
वेल्हे (जिल्हा पुणे) – छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या राज्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर लवकरच राजगड तालुका होणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळा जवान संघटना आणि तालुक्यातील शिष्टमंडळाला दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आणि शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या त्रिशत अमृत महोत्सवी वर्षात स्वराज्याची पहिली राजधानी आणि स्वराज्यातील पहिला तालुका असलेल्या राजगडाचे नाव वेल्हे तालुक्याला देऊन छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे. ‘शिवराष्ट्र हायकर्स’चे अध्यक्ष, मावळा संघटनेचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय अध्यक्ष आणि तालुक्यातील ग्रामस्थ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राजगड तालुका नामांतराचा प्रस्ताव मांडला. शिवकाळातील राजगड तालुका असलेली ऐतिहासिक कागदपत्रे ही या वेळी मुख्यमंत्र्यांना सादर केली. त्या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘याची सविस्तर माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ’, असे सांगितले. जिल्हा परिषद, स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनीही नामांतराचा प्रस्ताव राज्यशासनाकडे सादर केला आहे.