ज्ञानयोगी पू . अनंत आठवले यांच्याकडून ज्ञानामृत प्राप्त करण्याची तळमळ असणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) शिरीष देशमुख (वय ७६ वर्षे)
५.११.२०२२ हा श्री. शिरीष देशमुख यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने….
कै. शिरीष देशमुख हे ज्ञानमार्गी होते. ते त्यांच्या अध्यात्मशास्त्रातील शंका ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांना विचारत असत. त्यांच्या ज्ञानाच्या संदर्भातील शंका आणि त्यांचे ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांनी केलेले शंकानिरसन याविषयीचे एक पत्र येथे दिले आहे. या पत्रातून शिरीष देशमुख यांची जिज्ञासा, त्यांच्या साधनेचा स्तर, त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती असणारी श्रद्धा आणि पू. भाऊकाका यांच्या प्रतीचा आदर अन् त्यांच्याकडून शिकण्यासाठीचा शिष्यभाव दिसून येतो.
।। श्री ।।
५.१०.२०२२
पू. भाऊकाका,
साष्टांग नमस्कार,
आज विजयादशमी आहे. त्यानिमित्त मी आपल्याला आणि सौ. सुनीतीताई (ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांच्या पत्नी) यांना साष्टांग नमस्कार करतो. ‘आपले आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी रहावेत’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ‘२४.९.२०२२ या दिवशी आपण मला लिहिलेले पत्र मिळाले; मात्र काही कारणांमुळे मला त्याचे उत्तर देण्यास विलंब झाला’, यासाठी मी आपली क्षमा मागतो.
१. ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांनी पत्राद्वारे मार्गदर्शन करण्याची सिद्धता दर्शवल्याबद्दल आभार व्यक्त करणे
आपली प्रकृती स्वस्थ रहात नसतांनाही ‘माझ्यासारख्या प्राथमिक अवस्थेत असणार्या आणि ज्ञानयोगाच्या मार्गाने साधना करण्याचा प्रयत्न करणार्या साधकाला आपण पत्राद्वारे मार्गदर्शन करण्याची सिद्धता दर्शवली’, याबद्दल मी आपला आभारी आहे.
२. ज्ञानयोगाच्या मार्गाने साधना करतांना न कळलेल्या सूत्रांविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा दर्शवणे
माझ्या मनात अध्यात्मशास्त्राविषयी कुठलेही विकल्प नाहीत; मात्र ज्ञानयोगाच्या मार्गाने साधना करतांना माझ्या मनात काही प्रश्न आहेत. त्यांना मी शंका म्हणणार नाही. ‘तो माझ्या अज्ञानाचाच भाग आहे’, असे मी समजतो. प्रारंभी मी मला न कळलेली ३ सूत्रे पुढे दिली आहेत.
२ अ. ‘जन्ममृत्युजराव्याधि…’ या श्लोकामध्ये ‘ज्ञानप्राप्तीसाठी सांगितलेला गुण ! : ज्ञानप्राप्तीसाठी योग्यता मिळवण्यासाठी जे गुण अंगी बाळगावे लागतात, त्यातील ‘जन्ममृत्युजराव्याधिदु:खदोषानुदर्शनम्।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १३, श्लोक ८), म्हणजे ‘जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि रोग यांमध्ये दुःख अन् दोष यांचा वारंवार विचार करण्याची बुद्धी असणे’, हा एक गुण सांगितला आहे. मला त्याचा नेमका अर्थ कळला नाही.
२ आ. ‘काळाचे स्वरूप’ समजण्यासाठी श्रीमद्भागवत यात सांगितलेले वचन ! : आपण आपल्या चरित्र ग्रंथ (ज्ञानयोगी पू. अनंत आठवले) भाग २ मध्ये ‘काळाचे स्वरूप काय ?’ हे कळण्यासाठी ‘गुणव्यतिकराकारो कालः।’ (श्रीमद्भागवत, स्कंध ३, अध्याय १०, श्लोक ११), म्हणजे ‘सत्त्वादी त्रिगुणांचा परिणाम हाच ज्याचा आकार आहे तो काळ होय’, या वचनाचा संदर्भ दिला आहे. मला त्यातील गुण आणि ‘व्यतिकर’ म्हणजे परिवर्तन या २ शब्दांचा नेमका अर्थ कळला नाही. हे गुण म्हणजे त्रिगुणातील कि पदार्थांचे गुण ? आपण ‘रसायनशास्त्रात ज्याला ‘प्रॉपर्टी’ म्हणतो ते ?
२ इ. ‘देह, अहं आणि जीवात्मा वेगवेगळे आहेत’, असे जाणवणे; मात्र देहामुळेच अहं आणि जीवात्मा यांचे अस्तित्व जाणवत असल्यामुळे ‘देहाच्या व्याधी ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाच्या आड येऊ नयेत’, यांसाठी आवश्यक ते उपचार करून घेणे योग्य आहे’, असे वाटणे : गेली ६ – ७ वर्षे मी ज्ञानयोगाच्या मार्गाने (स्वतःच्याच मनाने) साधना करून सध्या पुढील स्थानावर (साधनेतील पुढच्या टप्प्यावर) पोचलो आहे. मला ‘देह, मी (अहं) आणि माझा जीवात्मा अशा ३ वेगवेगळ्या वस्तू आहेत’, असे वाटते. मला देह त्रयस्थ वाटतो. ‘देहाला झालेल्या व्याधी मला झाल्या नसून तो एक प्रारब्ध भोगण्याचा भाग आहे; मात्र या देहामुळेच मी (अहं) आणि जीवात्मा या वस्तूंचे माझ्यासाठी अस्तित्व आहे. त्यामुळे ‘देह सांभाळणे’, हा साधनेचाच एक भाग असून ‘देहाच्या व्याधी माझ्या ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाच्या आड येऊ नयेत; म्हणून आवश्यक ते उपचार करून घेणे’, हे माझे विहित कर्मच आहे’, असे मला वाटते.
३. मी (अहं) आणि जीवात्मा यांच्यातील द्वैत दूर करण्यासाठी सर्व कर्मे परेच्छेने किंवा ईश्वरेच्छेने करण्याचे प्रयत्न चालू असणे
मी (अहं) आणि जीवात्मा यांच्यातील द्वैत दूर होणे आवश्यक आहे; मात्र चित्तशुद्धी आणि इतर आवश्यक गुण आल्याशिवाय ते शक्य नाही. ‘नुसती जिज्ञासा आणि ईश्वरप्राप्तीची तळमळ असणे पुरेसे नाही’, असे मला जाणवते. ‘माझा जीवात्मा आता गीतेतील १३ व्या अध्यायातील २२ व्या श्लोकाप्रमाणे उपद्रष्टा (समीप राहून पहाणारा), अनुमन्ता (अनुमोदन देणारा), भर्ता (सर्वांचे धारण-पोषण करणारा) या अवस्थेपर्यंत पोचून भोक्ता (भोग घेणारा) या अवस्थेपर्यंत आला आहे’, अशी मला जाणीव होते. मी सर्व कर्मे परेच्छेने किंवा ईश्वरेच्छेने करण्याचा प्रयत्न करत आहे.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ईश्वर असून त्यांच्या कृपेने सर्व ऐहिक दायित्वातून मुक्त झाल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधण्याचे प्रयत्न केले जाणे
परम पूज्यांच्या कृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने) मी व्यावसायिक, व्यावहारिक, कौटुंबिक आणि आर्थिक अशा सर्व दायित्वांतून मुक्त झालो आहे. आता आश्रम हेच माझे घर झाले आहे. ‘परम पूज्य, ईश्वर आणि ब्रह्म यांच्यात काही भेद आहे’, असे मला वाटत नाही. सध्या मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला करायला सांगितलेला आणि गीतेत सांगितलेला ‘ॐ’, हा नामजप करतो. सध्या माझ्याकडून फारसे वाचन होत नाही. केवळ ब्रह्माशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करतो.
‘या पुढील मार्गक्रमण कसे करावे ?’, याविषयी मार्गदर्शन करावे’, ही विनंती.
– आपला नम्र,
श्री शिरीष देशमुख, सनातन आश्रम, गोवा. (५.१०.२०२२)
पू. अनंत आठवले यांनी केलेले त्यांचे शंकानिरसन।। श्रीकृष्णाय नम: ।।श्री.शिरीष देशमुख १. जन्ममृत्युजराव्याधिदु:खदोषानुदर्शनम्।। शरीरात आल्यावर म्हातारपण, रोग, मृत्यू इत्यादी त्रास मागे लागतात. ह्या सर्व स्थिती सदोष असून दु:खदायक आहेत ही गोष्ट नीट लक्षात घेतली आणि स्मरणात राहिली तर शरीरातील आसक्ती उणावत जाईल आणि जन्ममृत्यूच्या चक्रांतून कायमचे कसे सुटायचे ह्यावर चिंतन सुरू होईल; म्हणून शरीरांतील दोषांकडे लक्ष देणे हा गुण आहे, जो आपल्याला देहाच्या आसक्तीतून सोडवतो. २. गुणव्यतिकराकारो काल:। गुण म्हणजे तुम्ही उल्लेख केल्यानुसार प्रॉपर्टी. उदा. पाण्याचे बर्फ होते किंवा वाफ होते. त्रिगुणांमधील सत्व, रज, तम ह्या गुणांचे परिवर्तन होत नाही. म्हणजे सत्व पालटून रज किंवा तम बनत नाही, तसेच रज आणि तमाचे. आपण केवळ इच्छेनुसार आणि प्रयत्नांनी त्यांच्या आपल्यावरील प्रभावाला दूर ठेवू शकतो. ३. तुम्ही म्हटले आहे की देह इत्यादी तीन वेगवेगळ्या वस्तू आहेत. हे खरे आहे, पण त्या देह, जीवात्मा आणि ईश्वर अशा आहेत. ‘आत्मज्ञानाने संचित जळते’ ह्या विषयीचा लेख तुमच्याकडे पाठवला होता. त्यातील पूर्वार्ध बघावा. इंद्रिये, मन आणि बुद्धी (देह, प्रकृती) हा एक भाग; जीवात्मा हा दुसरा भाग आणि ईश्वराचा अंश असणारा शुद्ध आत्मा हा तिसरा भाग. भगवद्गीतेतील ‘पुरूषोत्तम योग’ हा पंधरावा अध्याय पाहावा. तिथे वेगळ्या शब्दात ह्यांनाच क्षर पुरूष, अक्षर पुरूष आणि पुरुषोत्तम म्हटले आहे. आपल्या पत्रातील इतर काही सुत्रांवर मत मांडत आहे. १. अहं आणि जीवात्मा हे एकच आहेत. ‘मी’ आणि ‘जीवात्मा’ ह्यांच्यातील द्वैत दूर करायचे नसून जीवात्मा आणि ईश्वर यांच्यातील द्वैत दूर करायचे आहे. वस्तुत: जीवात्मा आणि ईश्वराचाच अंश असलेला आत्मा, ह्यांच्यात भेद नाहीच. आत्मा त्रिगुणांच्या प्रभावाखाली आल्याने जीवात्मा बनल्याने भेद वाटतो. तो प्रभाव झटकून टाकल्यावर वेगळेपणा तो काय ? त्यापुढे केवळ शाब्दिक ज्ञान नाही, तर बोध झाल्यावर गीतेतील अध्याय ७ श्लोक १९ मधील ‘वासुदेव: सर्वम्’ हे सर्व विश्व, सर्व उत्पत्ती ईश्वरच आहे ह्याची अनुभूती येते. देहासह सर्व उत्पत्तीची प्रचीती ईश्वरातच होते. मग तीन वस्तू नाहीत, तर केवळ एकच आहे असा अनुभव येतो. अद्वैत ! २. शरीरातील विकारांवर उपचार करवून घेणे, हे योग्यच वाटते. ३. गीतेतील अध्याय १३ श्लोक २२ चा अर्थ पुन्हा एकदा बघावा. उपद्रष्टा, अनुमन्ता इत्यादी अवस्था क्रमाने वरच्या स्तराच्या नाहीत, उपद्रष्टा हा साक्षीभाव आहे. पूर्ण लिहीत नाही कारण पत्र फार लांबेल. परम पुरुष देहात असताना त्याला परमात्मा म्हणतात, त्याचे हे वर्णन आहे. ४. आपली परमपूज्यांवर दृढ श्रद्धा आहे आणि सद्गुरूंनी मंत्र दिला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे, मग प्रगती होणारच! – अनंत आठवले ।।श्रीकृष्णार्पणमस्तु।। |