इस्रायलमध्ये बेंजामिन नेतान्याहूच !
इस्रायलमध्ये १२० सदस्यसंख्या असून बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने ६४ जागा जिंकत बहुमताचा आकडा पार केला आहे. ७३ वर्षीय बेंजामिन नेतान्याहू हे यापूर्वी ४ वेळा इस्रायलचे पंतप्रधान राहिले असून ते आता ५ व्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारतील. नेतान्याहू यांना बाजूला सारून करण्यात आलेल्या आघाड्यांचे सरकार २ वर्षांत स्थिर राहू शकले नाही. आता मात्र या बहुमतामुळे इस्रायलमधील गेल्या २ वर्षांपासून चालू असलेली अस्थिरता संपुष्टात आली आहे. याच समवेत गेल्या २ वर्षांत अन्य पक्षांचे सरकार तेथे असल्याने भारत-इस्रायल यांच्यातील संबंधही फारसे चांगले नव्हते. आता परत एकदा सत्ता हातात घेतलेले बेंजामिन नेतान्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात विशेष मित्रत्वाचे संबंध आहेत. नेतान्याहू यांच्या विजयावर प्रतिक्रिया देतांना नरेंद्र मोदी यांनी ‘माझे मित्र नेतान्याहू यांनी विजय मिळवल्याविषयी अभिनंदन ! आम्ही एकत्रितपणे भारत-इस्रायल सामरिक भागीदारी पुढे नेऊ’, असे म्हटले आहे. नेतान्याहू हे पंतप्रधान झाल्यामुळे भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश आतंकवाद, तंत्रज्ञान अन् व्यापार पुढे नेण्यासाठी एकत्र काम करतील, तसेच दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करारास अधिक गती मिळेल, यात शंकाच नाही.
शेजारी आतंकी देशांच्या विरोधात कठोर भूमिका !
आतंकवादाचे सातत्याने समर्थन करणारा आणि इस्रायलला कायमच पाण्यात पहाणार्या पॅलेस्टाईनच्या विरोधात बेंजामिन नेतान्याहू यांनी नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ ही जिहादी आतंकवादी संघटना सातत्याने इस्रायलवर आक्रमण करते. त्यामुळे जेव्हा जेव्हा पॅलेस्टिनी किंवा हमास इस्रायलवर आक्रमण करतात, तेव्हा तेव्हा नेतान्याहू यांनी त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. ‘हमास’ला जोपर्यंत पूर्णपणे नेस्तनाबूत करत नाही, तोपर्यंत हे प्रतिआक्रमण चालू राहील’, असे त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे. विशेष करून आजबाजूला असलेल्या ५ इस्लामी राष्ट्रांच्या कुरघोडीला इस्रायल नेहमीच पुरून उरले असून यात नेतान्याहू यांच्या आक्रमक भूमिकेचा नेहमीच अग्रक्रमाचा वाटा होता. आतंकवादाच्या विरोधात ‘शून्य सहानभूती’चे धोरण राबवणार्या नेतान्याहू यांच्याकडून भारतीय शासनकर्त्यांनी बोध घेणे आवश्यक आहे.
बेंजामिन नेतान्याहू यांनी जेव्हा जेव्हा पंतप्रधानपद भूषवले, तेव्हा तेव्हा देशाला आर्थिक स्थिरता देण्याचा प्रयत्न केला. सातत्याने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्वीकारत इस्रायलला युद्धक्षेत्रात तंत्रज्ञान निर्यात करणारा एक सक्षम देश बनवण्यात मोलाची भूमिका पार पाडली. नेतान्याहू यांच्याकडे एक खंबीर नेता म्हणून पाहिले जाते. त्यांनी ज्यूंच्या अधिकारांसाठी नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपिठावरही खंबीर भूमिका घेतली. ‘इस्रायल हे ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र असून त्याच्या उत्कर्षासाठीच माझे जीवन आहे’, अशीच भूमिका त्यांनी नेहमी घेतली आहे. त्यामुळे वयाच्या ७३ व्या वर्षीही त्यांची लोकप्रियता टिकून आहे.
भारतीय संस्कृतीवर विशेष प्रेम !
बेंजामिन नेतान्याहू यांना भारतीय संस्कृतीविषयी विशेष प्रेम आहे. कोरोना महामारीच्या संसर्गामुळे ‘नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धत म्हणजे हात जोडून ‘नमस्ते’ म्हणावे’, असे आवाहन त्यांनी केले होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतःचे दोन्ही हात जोडले आणि सर्वांना ‘नमस्ते’ म्हटले, तसेच भारतीय नागरिक इतरांना कसे भेटतात आणि स्वागत करतात, हे नागरिकांना समजावले होते. सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलची भेट घेतली होती, तेव्हा ‘आपका स्वागत है मेरे दोस्त’, असे हिंदीत बोलून ‘गेली ७० वर्षे आम्ही या क्षणाची वाट पहात होतो’, असे भारताविषयीचे गौरवोद्गार नेतान्याहू यांनी काढले होते. इस्रायल देशात भारतीय संस्कृतीही विशेषत्वाने जपली जाते. इस्रायलमध्ये ‘मायबोली’ नावाच्या मराठी मासिकाचे प्रकाशन होते, तसेच कोचीन येथून आलेले ज्यू लोक ओणमचा सण साजरा करतात. त्यामुळे भारतीय संस्कृतीविषयी आदर असलेली व्यक्ती परत एकदा पंतप्रधान झाल्याने सांस्कृतिक देवाणघेवाणही वाढण्यास नक्कीच साहाय्य होईल, यात शंकाच नाही.
भारत-इस्रायलची संरक्षण क्षेत्रात देवाणघेवाण !
वर्ष १९९० पासूनच भारत आणि इस्रायल यांच्यात संरक्षणविषयक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होत आहे. भारत कोट्यवधी रुपयांचे लष्करी साहित्य इस्रायलकडून आयात करतो. विशेषकरून मनुष्यरहित विमान, क्षेपणास्त्र आणि रडार व्यवस्था हे आपण नेहमी इस्रायलकडून खरेदी करतो. याचसमवेत काश्मीरसारख्या बर्फाळ प्रदेशात लक्ष ठेवण्यासाठी ‘हेरोन ड्रोन’, ‘सेंसर’, ‘थर्मल इमेजिंग’ उपकरण, अंधारात विशेष प्रकाशव्यवस्था देणार्या उपकरणांमुळे आतंकवादाच्या विरोधात लढाईसाठी मोठे साहाय्य मिळाले आहे. ‘बराक-८’ ही हवेतील अशी क्षेपणास्त्रविरोधी व्यवस्था आहे की, जिला भारत आणि इस्रायल यांनी संयुक्तरित्या विकसित केली आहे. ही व्यवस्था भूमी आणि समुद्र अशा दोन्ही ठिकाणी लावली जाऊ शकते. या व्यवस्थेमुळे आपल्याकडे येणारे कोणतेही क्षेपणास्त्र, लढाऊ विमान १५० किलोमीटर अंतरावर असतांना कळणे शक्य होते. ‘मेक इन इंडिया’तही इस्रायलची तंत्रज्ञानातील गुंतवणूक चांगल्या प्रकारे असून नेतान्याहू परत एकदा पंतप्रधान झाल्याने भारतात उत्पादित होणार्या सर्वच स्वदेशी उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रात गती मिळेल. त्यामुळे भारत सरकारने आतंकवादाच्या विरोधात आणखी खुलेपणाने इस्रायलचे साहाय्य घेऊन ‘आतंकवादमुक्त भारत’ करावा, हीच अपेक्षा !
बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडून आतंकवादाच्या विरोधात ‘शून्य सहानुभूती’चे धोरण भारतीय शासनकर्त्यांनी अंगीकारावे ! |