पंतप्रधान मोदी यांच्याकडून इस्रायलचे नवनियुक्त पंतप्रधान नेतान्याहू यांचे अभिनंदन
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले ७३ वर्षीय बेंजामिन नेतान्याहू पुन्हा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणार आहेत. यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतान्याहू यांचे अभिनंदन केले आहे. मोदी यांनी ट्वीट करून ‘माझे मित्र’ नेतान्याहू यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन ! आम्ही एकत्रितपणे भारत-इस्रायल सामरिक भागीदारी पुढे नेऊ’, अशा शब्दांचे नेतान्याहू यांचे अभिनंदन केले.
PM Modi congratulates Israel’s newly-elected leader Benjamin Netanyahu https://t.co/ZtA2xpv6mE
— Republic (@republic) November 3, 2022
१. ३ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या मतमोजणीच्या अंतिम फेरीत नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षप्रणित आघाडीने १२० पैकी ६४ जागा जिंकल्या. इस्रायलमध्ये गेल्या ३ वर्षांत पाचव्यांदा निवडणुका झाल्या आहेत.
२. नेतान्याहू वर्ष १९९६ ते १९९९ आणि वर्ष २००९ ते २०२१ अशी १५ वर्षे इस्रायलचे पंतप्रधान राहिले आहेत. १५ नोव्हेंबरनंतर औपचारिकपणे ते पंतप्रधान म्हणून नियुक्त होतील.
नेतान्याहू-मोदी यांचे सलोख्याचे संबंध !
नेतान्याहू इस्रायलचे पंतप्रधान असतांना ५ वर्षांपूर्वी भारतात आले होते. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे स्वागत करण्यासाठी शिष्टाचार (प्रोटोकॉल) मोडून स्वतः विमानतळावर गेले होते. त्याच वर्षी मोदीही इस्रायलच्या दौर्यावर गेले. इस्रायलला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. दोघांनी एकमेकांना ‘मित्र’ असे संबोधले आहे. आता नेतान्याहू पंतप्रधान झाल्यामुळे भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश आतंकवाद, तंत्रज्ञान आणि व्यापार, यांवर एकत्र काम करू शकतील. दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करारही होऊ शकतो, असे बोलले जात आहे.