पू. नंदा आचारी गुरुजी यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘३.११.२०२२ या दिवशी मला कु. मेघा चव्हाण यांचा संदेश आला की आश्रमात कारवारहून आलेले श्री. नंदा आचारी गुरुजी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम दुपारी २ वाजता आहे. मला थकवा असल्यामुळे मी या कार्यक्रमाला स्थुलातून म्हणजे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे मी त्यांना प्रत्यक्ष पाहिले नाही; परंतु या कार्यक्रमाचा निरोप मिळताच मला श्री. नंदा आचारी गुरुजी यांच्या संदर्भात पुढील सूत्रे जाणवली.
१. श्री. नंदा आचारी गुरुजी हे संत झाले आहेत.
२. श्री. नंदा आचारी गुरुजी यांनी गेल्या जन्मी शिवाची उपासना केल्यामुळे त्यांची जन्मत: आध्यात्मिक पातळी ६० टक्के होती.
३. त्यांच्यावर असलेल्या त्यांच्या गुरूंच्या कृपेमुळे त्यांना मूर्तीकलेत प्राविण्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांना या कलेतील सर्वच पैलू अवगत झाले आहेत.
४. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने अव्यक्त भाव असून त्यांची साधना निर्गुण स्तरावर चालू आहे. त्यामुळे ते स्थुलातून देवतांच्या मूर्ती घडवत असले, तरी त्या मूर्तींमध्ये केवळ देवतांचे सगुण तत्त्व न येता त्यांचे निर्गुण तत्त्वही १० ते ३० टक्के इतक्या प्रमाणात आकृष्ट होते.
५. पू. नंदा आचारी गुरुजी यांची विविध योगमार्गांनुसार झालेली साधना
६. श्री. नंदा आचारी गुरुजी यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केल्यावर त्यांच्या आज्ञाचक्रातून चैतन्याचा पिवळा झोत बाहेर पडला आणि त्यांच्याभोवती जनलोकाचे पिवळसर रंगाचे तेजोमय आणि चैतन्यदायी वायुमंडल निर्माण झाले. तेव्हा मला सूक्ष्मातून चंदनाचा सुगंध आला.
७. श्री. नंदा आचारी गुरुजी यांचे संतपद घोषित केल्यावर त्यांच्या नयनांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा त्यांच्या चित्तातील भक्ती आणि आनंद भावाश्रूंच्या रूपाने व्यक्त झाल्याचे जाणवले. त्यामुळे कार्यक्रमस्थळाचे वातावरण पुष्कळ भावमय आणि आनंददायी झाले.
८. विनम्रता, शालीनता, धर्माचरण करण्याची तीव्र तळमळ, समर्पित भाव आणि समष्टी भाव अशा विविध गुणांचा समुच्चय त्यांच्यामध्ये झालेला आहे.
९. त्यांचे संतपद घोषित झाल्यावर देवशिल्पी विश्वकर्मा आणि इतर देवतांनी श्री. नंदा आचारी गुरुजी यांच्यावर दिव्य पुष्पांचा वर्षाव करून त्यांचा गौरव केला. तेव्हा आश्रमातील वातावरण पुष्कळ शीतल आणि आनंददायी झाल्याचे जाणवले.
१०. श्री. नंदा आचारी गुरुजी यांच्यामध्ये भगवंताप्रती निष्काम भाव आहे. त्यामुळे ते प्रत्येक कर्म निरपेक्षभावाने करतात. त्यामुळे त्यांची अशीच आध्यात्मिक उन्नती होऊन ते लवकरच सद्गुरुपद प्राप्त करणार आहेत.
कृतज्ञता : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला खोलीत राहून पू. श्री. नंदा आचारी गुरुजी यांच्या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा करता आली’, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.११.२०२२)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |