फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ !
पुणे – दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांच्या धुरामुळे हवेचा दर्जा खालावला असून त्यामुळे अनेक श्वसनाच्या विकारांना निमंत्रण मिळाले आहे. जंतूंचा संसर्ग, खोकला, दमा आदी आजारांचे रुग्ण वाढल्याचे निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे. ‘सफर’ या संस्थेकडून प्रकाशित केलेल्या अहवालाअन्वये पुणे शहरातील हवेची प्रतवारी समाधानकारक या गटात असली तरी फटाक्यांमुळे होणार्या प्रदूषणाचा परिणाम शहरातील नागरिकांच्या श्वसन संस्थेच्या आरोग्यावर दिसून आला आहे. दिवाळीनंतर हवेतील प्रदूषकांची पातळी वाढते. या हवेत श्वास घेतल्याने मोठ्या प्रमाणात दूषित घटक श्वासावाटे शरिरात घेतले जातात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे, दम्याचा आजार बळावणे, ‘ब्राँकायटिस’, ‘निमोनिया’ आदी आजारांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांनाही या प्रदूषित हवेमुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे.