सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची (अप्पाकाकांची) आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत
सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत. ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘ती. अप्पाकाका रामनाथी आश्रमात वास्तव्याला असतांना त्यांना आलेले अनुभव’ हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
(ही मुलाखत सद्गुरु डॉ. वसंत आठवले आणि पू. शिवाजी वटकर संत होण्यापूर्वीची असल्याने या लेखमालेतील संतांच्या नावामध्ये पालट केलेला नाही. – संपादक)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/624980.html
५. प.पू. डॉक्टरांची आध्यात्मिक गुरु म्हणून आढळलेली वैशिष्ट्ये
श्री. शिवाजी वटकर : तुमचे लहान भाऊ प.पू. डॉक्टर यांची आध्यात्मिक गुरु म्हणून तुम्हाला आढळलेली वैशिष्ट्ये सांगा.
ती. अप्पाकाका :
५ अ. अनंत वैशिष्ट्ये असलेल्या प.पू. डॉक्टरांची वैशिष्ट्ये कळणेही कठीण आहे ! : प.पू. डॉक्टरांची वैशिष्ट्ये अनंत आहेत. त्यांच्या लीलाही अनंत आहेत. त्या सर्व लीला समजणे बुद्धीच्या पलीकडचे आहे; कारण बुद्धीलय होऊन विश्वबुद्धीशी एकरूप झालेल्या प.पू. डॉक्टरांची वैशिष्ट्ये कळणेही माझ्यासारख्या सामान्य जिवाला कठीण आहे.
५ आ. प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी भेट झाल्यावर प.पू. डॉक्टरांनी त्यांना तन, मन आणि धन अर्पण करून, गुर्वेच्छेने वागून केवळ ४ – ५ वर्षांत संतत्व आणि १० वर्षांत परात्पर गुरुपद प्राप्त करून घेणे : प.पू. डॉक्टर आरंभी परमेश्वराचा विचार करत नव्हते. त्यांच्याकडे उपचारांसाठी येणार्या मनोरुग्णांपैकी काही मनोरुग्ण संमोहन-उपचार शास्त्राने ठीक का होत नाहीत ? भुते अस्तित्वात असतात का ? इत्यादी विषयांच्या जिज्ञासेमुळे ते सद्गुरूंच्या शोधात होते. वर्ष १९८७ मध्ये प.पू. डॉक्टरांची प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी भेट झाल्यावर प.पू. डॉक्टर त्यांना पूर्णपणे शरण गेले. त्यांना तन, मन आणि धन अर्पण करून, गुर्वेच्छेने वागून केवळ ४ – ५ वर्षांत संतत्व प्राप्त करून घेतले आणि १० वर्षांत परात्पर गुरुपद प्राप्त करून घेतले.
५ इ. प.पू. डॉक्टरांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणार्या ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती करणे आणि ‘ज्ञानयोगापेक्षा भक्तीयोग अन् भक्तीयोगापेक्षा गुरुकृपायोग श्रेष्ठ आहे’, हे सिद्ध करून दाखवणे : आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून प.पू. डॉक्टरांनी भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग आणि हठयोग यांपेक्षा अधिक श्रेष्ठ, अधिक सोपा आणि सर्वांत शीघ्र आध्यात्मिक उन्नती करणारा ‘गुरुकृपायोग’ शोधून काढला. ‘अध्यात्मात ज्ञानयोगापेक्षा भक्तीयोग आणि भक्तीयोगापेक्षा गुरुकृपायोग श्रेष्ठ आहे’, हे सिद्ध करून दाखवले.
५ ई. प.पू. भक्तराज महाराज यांनी अध्यात्माचा अभ्यास केलेला नसूनही प.पू. डॉक्टरांनी त्यांना विचारलेल्या आध्यात्मिक प्रश्नाचे त्यांनी सहजतेने उत्तर देणे : प.पू. भक्तराज महाराज यांनी अध्यात्माचा अभ्यास केलेला नव्हता. ते गुरुचरित्र वाचायचे. त्यांचे पूर्वीचे जीवन पूर्णपणे व्यावहारिक आणि धंदेवाईकाप्रमाणे असूनही ते सद्गुरु अनंतानंद साईश यांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांनी जिवेभावे गुरूंची अहर्निश (रात्रंदिवस) सेवा करून केवळ १८ मासांत संतपद, गुरुपद प्राप्त करून घेतले. प.पू. डॉक्टरांनी त्यांना विचारलेल्या कोणत्याही आध्यात्मिक प्रश्नाचे योग्य उत्तर ते सहजतेने लगेच द्यायचे.
५ उ. भगवान श्रीकृष्णाने प.पू. डॉक्टरांना बुद्धी, म्हणजेच ज्ञान दिल्यामुळे ते अध्यात्मातल्या कठीण प्रश्नांची उत्तरे आणि गूढ ज्ञानातील चुका लगेच सांगू शकणे
१. मी केलेल्या अध्यात्माच्या अभ्यासाच्या मानाने प.पू. डॉक्टरांनी अध्यात्माचा अभ्यास अल्प प्रमाणात केला आहे. असे असूनही मला गूढ वाटणार्या अध्यात्मातल्या कठीण प्रश्नांची उत्तरे ते लगेच देतात.
२. सनातनच्या सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या सौ. अंजली गाडगीळ (आताच्या श्री श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ) आणि इतर साधक यांना मिळणार्या गूढ ज्ञानातील चुका सुधारण्याचे सामर्थ्य केवळ प.पू. डॉक्टरांमध्येच आहे; कारण त्यांची सूक्ष्मतम बुद्धी विश्वबुद्धीशी, महत् तत्त्वाशी एकरूप झाली आहे.
भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे ‘ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ।।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक १०
अर्थ : मी तो तत्त्वज्ञानरूप योग देतो, ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात.
भगवान श्रीकृष्णाने प.पू. डॉक्टरांना बुद्धीयोग, म्हणजेच ज्ञानयोग दिला आहे.
५ ऊ. प.पू. डॉक्टर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैज्ञानिक भाषेमध्ये सर्व जगाला आध्यात्मिक ज्ञान पोचवण्याचे महान ईश्वरी कार्य करत असणे : सध्याचे युग हे विज्ञानाचे युग आहे. त्यामुळे प.पू. डॉक्टर साधकांना मिळालेले आध्यात्मिक ज्ञान, आधुनिक माहिती मायाजाल (इंटरनेट), संगणक, तसेच ध्वनीचित्रचकती इत्यादींद्वारे वैज्ञानिक भाषेमध्ये सर्व जगाला पोचवण्याचे महान ईश्वरी कार्य करत आहेत.
५ ए. गुरुकृपायोगानुसार साधना सांगून सामान्य जिवांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती करून घेणे
अ. आतापर्यंत सर्व संत नामजप करण्याचे महत्त्व सांगायचे. प.पू. डॉक्टरांनी गुरुकृपायोगाप्रमाणे अष्टांग साधना (टीप) सांगून अनेक सामान्य जिवांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती करून घेऊन अनेक साधकांना काही वर्षांतच संतत्वाला नेऊन ठेवले आहे. त्यामुळे ‘एकोऽहं बहुस्यां प्रजायेय ।’ म्हणजे ‘एक परमात्मा अनेक झाला’, याप्रमाणे प.पू. डॉक्टरांच्या संकल्पामुळे एका प.पू. डॉक्टरांपासून अनेक प.पू. डॉक्टर (गुरु) बनण्याच्या मार्गावर आहेत.
(‘३.८.२०२२ पर्यंत १०८६ साधकांनी ६० टक्के आणि त्याहून अधिक पातळी गाठली आहे. ११९ साधक संत (गुरु) बनले आहेत.’ – संकलक)
टीप – १. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ५. सत्संग, ६. सत्सेवा, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)
(वर्ष २०१०)
(क्रमशः उद्याच्या अंकात)
‘प.पू. डॉक्टरांविषयी आतापर्यंत साधकांनी अनेक लेख लिहिले आहेत; पण आताचे सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका) यांनी लिहिलेला हा लेख वाचल्यावर लक्षात येते, ‘त्यांनी या एकाच लेखात प.पू. डॉक्टरांची सर्वांगीण माहिती दिली आहे. प.पू. डॉक्टरांचे वैशिष्ट्य आणि त्यांचे श्रेष्ठत्व केवळ अप्पाकाकांनीच ओळखले होते.’ – (पू.) संदीप आळशी (ग्रंथाचे संकलक) |
|