सरकारी कर्मचार्यांनी त्रास दिल्यास व्हॉट्सॲपवर तक्रार करा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
पणजी, ३ नोव्हेंबर (वार्ता.) – सरकारी कार्यालयात कोणत्याही कर्मचार्याकडून गैरवागणूक मिळत असल्यास किंवा भ्रष्टाचारासाठी सतावणूक होत असल्यास संबंधित कर्मचारी आणि खाते यांच्या विरोधात सार्वजनिक गार्हाणी विभागाकडे आता थेट व्हॉट्सॲप अथवा ईमेल यांद्वारे किंवा संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. दक्षता सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘सरकारने सार्वजनिक गार्हाणी विभाग सक्रीय केला आहे. मागील ३ मासांत या विभागाकडे एकूण ३०६ तक्रारी आल्या आहेत आणि त्यातील ७० टक्के तक्रारींना न्याय देऊन आम्ही त्या सोडवल्या आहेत.
कनिष्ठ पातळीवरील कर्मचार्याने जर त्यांचे काम चोख बजावले, तर ९९ टक्के प्रकरणे वरिष्ठांपर्यंत पोचणारच नाही, तसेच मंत्री किंवा आमदार यांच्यापर्यंत तक्रार करण्यास वाव रहाणार नाही. काही अधिकार्यांकडे निर्णयक्षमता नसते. धारिका प्रलंबित राहून सरकारची हानी होते.’’