पुणे येथील १३० रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेणार ! – पथ विभाग प्रमुख
पुणे – पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्यांचे आधुनिक यंत्राद्वारे परीक्षण करण्यात आले असून १३० रस्त्यांच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचा अहवाल सल्लागार आस्थापनाकडून महापालिकेला देण्यात आला आहे. त्यामध्ये काही रस्त्यांची किरकोळ दुरुस्ती, तर काही ठिकाणी नव्याने रस्ता सिद्ध करावा लागणार आहे. या आस्थापनाकडून शहरातील रस्त्यांची पहाणी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये शहर आणि उपनगर येथील रस्त्यांचा समावेश होता. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचा प्राधान्यक्रम ठरवून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी यांनी दिली.
अहवालानुसार रस्त्यावर १ सहस्र ६०० मि.मी. ते एका कि.मी.पर्यंत चढउतार असतील, तर हा रस्ता चांगला समजण्यात येईल. एका कि.मी.ला ३ सहस्र मी.मी. चढउतार असेल, तर अशा रस्त्याची गुणवत्ता ठीक असल्याचे मानण्यात येईल; मात्र ६ सहस्र ते १० सहस्र मि.मी.पर्यंत रस्ता दुरुस्त करावा लागणार आहे. १० सहस्रांपेक्षा अधिक मि.मी. चढउतार असतील, तर असा रस्ता उखडून पुन्हा करावा लागणार आहे. यामध्ये अनेक रस्त्यांवरील मलवाहिन्यांची झाकणे पालटणे, समपातळीत झाकणे बसवणे, डांबराचा थर देणे, अनेक ठिकाणी, तसेच रस्त्यांवरील खड्डे भरणे, काही ठिकाणी नव्याने काँक्रीट करणे, पदपथाची दुरुस्ती करणे अशा प्रकरच्या दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहेत.