पक्ष्यांच्या विष्ठेमुळे मंत्रालय आणि विधीमंडळ परिसरातील नेते आणि राष्ट्रपुरुष यांच्या पुतळ्यांचे विद्रूपीकरण !
मुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) – मंत्रालयाच्या आवारात गांधीजी, नेहरू, तर विधीमंडळाच्या आवारात ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आदी नेते आणि राष्ट्रपुरुष यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत; मात्र या पुतळ्यांवर मेघडंबरी लावण्यात आलेले नाही. त्यामुळे पक्ष्यांच्या विष्ठेमुळे या पुतळ्यांचे विद्रूपीकरण होत आहे.
या राष्ट्रपुरुषांची जयंती, तसेच राष्ट्रीय उत्सव या वेळी मंत्रालय आणि विधीमंडळ परिसरातील पुतळ्यांची स्वच्छता केली जाते. त्यासाठी प्रशासनाकडून व्यवस्थाही करण्यात आली आहे; परंतु हे पुतळे म्हणजे पक्षांना बसण्याची एक जागा झाली आहे. त्यामुळे स्वच्छतेनंतरही काही दिवसांतच हे पुतळे पक्ष्यांच्या विष्ठेमुळे विद्रूप होतात. मंत्रालय आणि विधीमंडळ येथे महाराष्ट्रासह, देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच विदेशातूनही वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधी मंत्रालय अन् विधीमंडळ येथे येत असतात. भावी पिढीला या नेत्यांची ओळख व्हावी, या चांगल्या हेतूने जरी सरकारकडून राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारले जात असले, तरी त्यांच्या पुतळ्यांच्या होत असलेल्या विद्रूपीकरणामुळे एकप्रकारे त्यांचा अवमानच होत आहे. त्यामुळे एकतर पुतळ्यांची निगा राखता येत नसेल, तर सरकारने या नेत्यांचे पुतळे उभारू नयेत आणि उभारले, तर त्यांची योग्य प्रकारे निगा राखली जाईल, याविषयी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकाराष्ट्रपुरुषांचा अवमान होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी ! |