‘चुकांमुळे साधनेची हानी होऊ नये’, यासाठी चुका स्वीकारण्यासाठी साधकांनी केलेले प्रयत्न आणि त्यामुळे त्यांना जाणवलेले सकारात्मक पालट !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सर्व साधकांना भाववृद्धी सत्संगातून ‘भगवंताची भक्ती कशी करायला हवी ?’, हे शिकायला मिळत आहे. सर्व साधकांमध्ये भाव असूनही ते ‘त्यांच्यातील स्वभावदोषांमुळे होणार्या चुका आणि चुकांविषयी खंत नसणे’, यांमुळे ध्येयापासून भरकटत आहेत; म्हणूनच भगवंताने सर्व साधकांच्या साधनेची होणारी हानी भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून लक्षात आणून दिली आणि तितक्याच प्रेमाने खंत निर्माण होण्यासाठी दिशाही दिली. त्यानुसार साधकांनी स्वतःच्या चुकांचा अभ्यास करून केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.
१. सौ. मधुरा तोफखाने, सांगली
१ अ. सहसाधिकेच्या स्वभावदोषांकडे लक्ष दिल्याने मन अस्वस्थ होणे आणि भाववृद्धी सत्संगानंतर ही चूक लक्षात येऊन खंत वाटणे : ‘एका साधिकेसह सेवा करतांना मला तिच्या चुका दिसायच्या आणि तिच्या समवेत सेवा करतांना अस्वस्थताही जाणवायची. भाववृद्धी सत्संग चालू झाल्यावर ‘माझे सहसाधिकेच्या स्वभावदोषांकडे लक्ष असते; म्हणून मला अस्वस्थता येते’, हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मला त्याविषयी पुष्कळ खंत वाटू लागली. ‘माझ्यामध्ये इतके स्वभावदोष असतांना गुरुमाऊलीने मला स्वीकारले आहे आणि त्या साधिकेलाही स्वीकारले आहे. मग मी तिचे स्वभावदोष बघून अस्वस्थ का होते ?’, या विचाराने मला पुष्कळ खंत वाटली.
१ आ. उत्तरदायी साधिकेला स्वतःची चूक सांगून त्यावर प्रायश्चित्त घेणे आणि सहसाधिकेची क्षमा मागितल्यावर हलके वाटणे : अशा प्रकारची माझी चूक मी उत्तरदायी साधिकेला पहिल्यांदाच सांगितली आणि त्यावर प्रायश्चित्त घेतले. मी संबंधित साधिकेचीही मनापासून क्षमायाचना केली. हे प्रयत्न केल्यावर मला पुष्कळ हलके वाटू लागले. त्यानंतर घडलेल्या प्रत्येक प्रसंगात माझ्याकडून स्वतःची चूक आणि त्यामागील स्वभावदोष शोधण्याचा प्रयत्न झाला.
‘हे गुरुदेवा, मला इतर साधकांचे गुण बघता येऊ देत. तुम्ही मला या सगळ्यांतून पुढे घेऊन चला’, अशी गुरुदेवांच्या चरणी आर्त प्रार्थना होऊ लागली.’
२. सौ. स्मिता बोरकर, जुन्नर, पुणे
२ अ. चुका लिहितांना ‘देव माझ्यासमोर उभा आहे आणि मी देवाला आत्मनिवेदन करत आहे’, असा भाव ठेवणे आणि त्यासाठी घेतलेले प्रायश्चित्त पूर्ण करतांना आनंद मिळणे : ‘मी साधनेचे प्रयत्न यांत्रिकपणे करत होते. सत्संगातील विषय ऐकल्यापासून चुका लिहित असतांना ‘देव माझ्यासमोर उभा आहे आणि मी देवाला आत्मनिवेदन करत आहे’, असा भाव ठेवला. त्यानंतर चूक लिहिल्यावर, ‘देव माझ्याकडे पहात आहे’, असे मला जाणवू लागले. त्या चुकीसाठी प्रायश्चित्त पूर्ण करतांना मला आनंद मिळू लागला.’
३. सौ. अर्चना घनवट, पुणे
३ अ. स्वतःकडून झालेल्या चुकांची खंत वाटून साधकांना चुका सांगणे : ‘सत्संग ऐकल्यापासून मी माझ्याकडून झालेल्या चुका साधकांना सांगायला आरंभ केला. ‘प्रतिदिन दोन साधकांना स्वतःच्या चुका सांगून त्यासाठी क्षमायाचना करणे आणि या चुकांमुळे माझ्या साधनेवर किती परिणाम झाला आहे ?’, हेही सांगण्याचा प्रयत्न केला. तसे करतांना माझ्याकडून झालेल्या चुकांविषयी मला खंत वाटत होती.
३ आ. स्वभावदोषांमुळे होणार्या परिणामांचे चिंतन लिहितांना आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन हलकेपणा जाणवणे : एका शिबिरात सद्गुरु स्वाती खाडये यांनी मला ‘स्वभावदोषांमुळे आपण करत असलेल्या सेवेवर कसा परिणाम होतो ?’, याचे चिंतन करायला सांगितले होते. त्याविषयी चिंतन लिहितांना मला माझे पुष्कळ स्वभावदोष आणि अहंचे पैलू प्रसंगांसहित लक्षात आले. ते चिंतन लिहितांना माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन मला हलकेपणा जाणवला.
३ इ. चूक झाल्यावर संबंधित साधकांची लगेच क्षमायाचना केल्यामुळे मनातील विचार न्यून होणे : दुसर्या दिवसापासून माझ्याकडून चूक झाल्यानंतर मी लगेच क्षमायाचना करू लागले. पूर्वी मला साधकांविषयी प्रतिक्रिया आल्यावर मी ती मनातच ठेवत असे. त्या वेळी माझ्या मनात ‘साधकांना माझ्याविषयी काय वाटेल ?’, असा प्रतिमेचा विचार असायचा. आता माझ्या मनात तसा विचार येत नाही. साधकांची क्षमायाचना केल्यामुळे माझ्या मनातील विचार पुष्कळ न्यून झाले आहेत.’
४. श्री. प्रदीप जाधव, फलटण
४ अ. सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात जाऊन क्षमायाचना केल्यामुळे ‘बहिर्मुखता’ हा स्वभावदोष न्यून होणे : ‘मी प्रतिदिन सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात जाऊन २५ वेळा क्षमायाचना करण्यास आरंभ केला. तेव्हा मी माझ्या लक्षात आलेल्या आणि इतरांनी माझ्या लक्षात आणून दिलेल्या चुका सांगितल्या. क्षमायाचना केल्यामुळे माझ्यातील ‘बहिर्मुखता’ हा स्वभावदोष न्यून झाला आणि मला देवाच्या अनुसंधानात रहाण्यास साहाय्य झाले.’
५. सौ. समृद्धी जाधव, लोटे, जिल्हा रत्नागिरी.
५ अ. पूर्वी झालेली चूक भावसत्संगानंतर लक्षात येणे, त्याची खंत वाटणे आणि क्षमायाचना केल्यावर आनंद मिळणे : ‘सत्संगात ‘स्वतःचे विचार सकारात्मक असतात कि नकारात्मक ?’, याविषयी स्वतःचे निरीक्षण करायला सांगितले होते. मागे एका सत्संगात एका काकूंनी मला माझी चूक सांगितली होती. तेव्हा मला ती चूक स्वीकारता आली नव्हती. त्यावर मी स्पष्टीकरण दिले होते आणि वरवर त्यांची क्षमा मागितली होती. माझ्या मनात ‘ती चूक माझी नाही’, असा विचार येऊन संघर्ष होत होता. यात माझे १५ दिवस गेले. भावसत्संगानंतर ही चूक माझ्या लक्षात आली. माझ्यामुळे त्या काकूंना आणि मला झालेला त्रासही माझ्या लक्षात आला. तेव्हा मला त्या चुकीविषयी खंत वाटली आणि चूक स्वीकारता आली. रात्री मी देवाची क्षमायाचना केली आणि दुसर्या दिवशी त्या काकूंचीही क्षमा मागितली. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळाला. तेव्हापासून मला खंत वाटण्याचे प्रमाण वाढले आहे.
५ आ. कुटुंबियांनी सांगितलेल्या चुका स्वीकारता येऊन त्या चुका नियमितपणे सारणीमध्ये लिहिणे : या आठवड्यात कुटुंबियांनी सांगितलेल्या माझ्या चुका मला स्वीकारता आल्या. आता मी नियमितपणे सारणीमध्ये (चुका लिहिण्याची वही) चुका लिहिते. रात्री कितीही वाजले, तरी मी लिखाण झाल्याविना झोपत नाही. त्यातून मला फार आनंद मिळतो. माझ्या मनात येणार्या प्रत्येक अयोग्य विचाराविषयी मला पुष्कळ खंत वाटते. ‘मी एवढ्या चुका करत असूनही गुरुमाऊली मला तिच्या चरणी घेते’, असा कृतज्ञतेचा विचारही मनात असतो.’
(क्रमशः)
संकलक : कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.६.२०१९)
|