वारकर्यांना सोयी-सुविधा पुरवण्यातील त्रुटी सुधारण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन !
हिंदु जनजागृती समितीचा सुराज्य अभियानाच्या अंतर्गत उपक्रम
सोलापूर, २ नोव्हेंबर (वार्ता.) – पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे आषाढी आणि कार्तिकी या २ यात्रा मोठ्या प्रमाणात भरतात. शासन आणि प्रशासन यांच्याकडून मात्र पुष्कळ अल्प सुविधा वारकर्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. आषाढी-कार्तिकी वारीच्या काळात विविध योजनांसाठी, वारकर्यांना सुविधा देण्यासाठी, तसेच वर्षभरही कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होतो; मात्र त्याचा वारकर्यांना प्रत्यक्ष लाभ व्हावा, यासाठी प्रशासनाने नियोजनातील त्रुटी सुधारून वारकर्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत प्रशासनाकडे देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार (महसूल) दत्तात्रय मोहोळे यांनी स्वीकारले. या वेळी धर्मप्रेमी श्री. गणेश वास्ते, श्री. शुभम एकबोटे, श्री. निखिल बोगा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते.