डोंबिवलीतील ४० भूमाफियांची अधिकोषाची खाती गोठवली !
बेकायदा बांधकाम प्रकरण !
ठाणे, २ नोव्हेंबर (वार्ता.) – अनधिकृत इमारतींमधील सदनिका खरेदीदारांना खोटी कागदपत्रे खरी असल्याचे दाखवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणार्या डोंबिवलीतील ४० भूमाफियांची विविध अधिकोषांतील खाती अन्वेषण पथकाने गोठवली आहेत, अशी माहिती अन्वेषण पथकाचे प्रमुख, साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांनी दिली. उर्वरित २५ माफियांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचीही अधिकोषांतील खाती गोठवण्याची प्रक्रिया चालू केली जाणार आहे.
‘रेरा’कडून कारवाई
बांधकाम व्यावसायिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभाग देत असलेल्या अधिकृत बांधकाम अनुमतींऐवजी ‘बनावट इमारत बांधकाम अनुमती’ सिद्ध करून या त्याआधारे ‘महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणा’चे (रेरा) नोंदणी प्रमाणपत्र घेऊन शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला आहे. त्यामुळे ‘रेरा’ प्राधिकरणानेही ६५ बांधकाम व्यावसायिकांपैकी ५२ बांधकाम व्यावसायिकांची नोंदणी प्रमाणपत्र रहित करण्याची कार्यवाही केली आहे.
ईडीकडूनही कारवाईची शक्यता
या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाकडून याचे अन्वेषण चालू असतांनाच अंमलबजावणी संचालनालयानेही (‘ईडी’ने) याविषयीची कागदपत्रे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून मागवल्याने या प्रकरणातील बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
मुद्रांक वितरकावर कारवाई
डोंबिवलीतील एका मुद्रांक वितरकाने (स्टॅम्प वेंडर) अनधिकृत बांधलेल्या इमारतींची ‘खोटी कागदपत्रे खरी आहेत’, असे दस्त नोंदणीकरण कार्यालयात दाखवून ते दस्त नोंदणीकरणाचे काम केले असल्याची माहिती अन्वेषण पथकाच्या हाती लागली आहे. त्यामुळे या मुद्रांक वितरकालाही लवकरच चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकाशहरात आणि शहरांच्या शेजारील गावांमध्ये सर्वत्र अनधिकृत इमारतींचे डोंगरच्या डोंगर उभे रहात असतांना संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई होतांना आढळत नाही. अशा अनधिकृत इमारतींमुळे अधिकृत इमारतींत रहाणार्या नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांवर ताण येऊन या नागरिकांवर एक प्रकारे अन्यायच होतो, तसेच परिसराचे विद्रूपीकरणही होते ! यापूर्वीच अशा कारवाया सर्वत्र होणे अपेक्षित होते ! त्या न करणार्यांवरही कारवाई केली पाहिजे ! |