अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे कारवार येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) !
कारवार (कर्नाटक) येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) यांच्याकडून सनातन संस्थेने श्री सिद्धिविनायकाची मूर्तीे घडवून घेतली. सनातन संस्थेचे साधक श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार त्यांच्याकडे शिल्पकला शिकण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना गुरुजींकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पूर्वी शिष्य गुरूंकडे शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आश्रमात (गुरुकुलात) जात असत. तेव्हा ते आपल्या गुरूंना ‘गुरुजी’ असे संबोधत असत. त्याप्रमाणे शिल्पकार श्री. नंदा आचारी यांच्याकडे साधक श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार हे शिल्पकला शिकायला गेले होते. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या पुढील लेखात शिल्पकार श्री. नंदा आचारी यांना साधकांनी ‘गुरुजी’ असे संबोधले आहे. |
१. आनंदी आणि उत्साही
‘गुरुजी अतिशय उत्साही आणि आनंदी असतात. वय अधिक असूनही त्यांची सेवा करण्याची गतीही जलद आहे.’ – श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार
२. ‘त्यांचे राहाणीमान अतिशय साधे आहे.’ – श्री. रामानंद परब
३. तत्परता
‘वय अधिक असूनही ते अतिशय तत्परतेने प्रत्येक कृती करतात. त्यांचे घर मूर्ती बनवण्याच्या ठिकाणापासून साधारण १०० ते १५० फूट अंतरावर आहे. त्यांना वयोमानाप्रमाणे चालण्यास त्रास होतो आणि त्यांचे गुडघेही दुखतात, तरी आम्ही सेवा करतांना त्यांना आम्हाला काही दाखवायचे आठवले, तर ते घरी जाऊन ती वस्तू आणून आम्हाला दाखवतात. त्यांची ही कृती पाहून आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण आली. त्यांनाही आम्हाला काही दाखवायचे असल्यास विसरायला नको; म्हणून ते लगेच खोलीत जाऊन आणून दाखवायचे.
४. स्वावलंबी
४ अ. उतार वयातही कष्ट करून उदरनिर्वाह करणे : त्यांना कुठलेही व्यसन नाही. त्यांच्या औषधांसाठी जो व्यय होतो, तो त्यांनी कधीच त्यांच्या मुलांकडे मागितला नाही किंवा ते इतर कुणाकडेही मागत नाहीत. ते म्हणतात, ‘‘मी नेहमी स्वतःच कमावतो आणि ते पैसे वापरतो. देव माझी सोय करतो. जेव्हा पैसे नसतात, तेव्हा दुसर्या दिवशी कुणाच्या तरी माध्यमातून देव पैशांची सोय करतो. जोपर्यंत हात-पाय चांगले आहेत, तोपर्यंत स्वतःच कष्ट करायचे आणि कष्टाचे पैसे वापरायचे.’’
४ आ. स्वतःची सर्व कामे स्वतःच करणे : वय ८० वर्षे असूनही (आताचे वय ८२ वर्षे) ते स्वतःची कामे स्वतःच करतात. मूर्तीसाठी दगड पहायला किंवा कोणतेही साहित्य आणायला ते स्वतः दुचाकीवरून २०० ते ३०० कि.मी. पर्यंतचा प्रवास करतात. त्यांच्या मनात ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, असा केवळ एकच विचार असतो.’
– श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार
५. दशकलांचे अधिकारी असणे
‘त्यांना दशकला येतात. आतापर्यंत आपण पंचकला येणार्या व्यक्ती ऐकल्या आहेत; पण ‘भगवंताने मला दशकला दिल्या आहेत’, असे गुरुजी म्हणाले. त्यांना दगड, माती, सिमेंट, फायबर, लाकूड, चांदी, पितळ, तांबे, ॲल्युमिनिअम इत्यादी वस्तूंपासून मूर्ती बनवणे; जुन्या ‘टाईप रायटर’ची दुरुस्ती करणे; पेट्रोल आणि डिझेल इंजिन, चारचाकी, दुचाकी यांची दुरुस्ती करणे; शिलाईयंत्र बनवणे आणि त्याची दुरुस्ती करणे; ॲल्युमिनिअमचा वापर करून विळी बनवणे इत्यादी कला अवगत आहेत. इतकेच नाही, तर मूर्ती सिद्ध करण्यासाठी लागणारी यंत्रे किंवा अवजारे ते स्वतःच बनवतात.’ – श्री. रामानंद परब
६. प्रेमभाव
अ. ‘आम्ही मूर्ती बनवतांना ते मधे मधे आम्हाला चहा-बिस्कीटे द्यायचे.
आ. आम्ही आमच्या जेवणाचा डबा घेऊन जायचो. तेव्हा ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जायचे, बसायला चटई घालून द्यायचे आणि प्यायला पाणी आणून द्यायचे. ते अतिशय प्रेमळ असल्याने ‘त्यांच्या सहवासात सतत रहावे’, असे आम्हाला वाटायचे. त्यांच्या सहवासात आल्यावर ‘सहवास वेड लावी जिवा’, अशी आमची स्थिती झाली. ‘आम्ही संतांच्या समवेतच आहोत’, असे वाटायचे.
इ. ते प्रतिदिन सकाळी चालायला जातात. एकदा येतांना त्यांना रस्त्यात ताजी पालेभाजी विकणारे भेटले. तेव्हा ते आमच्यासाठी भाजी घेऊन आले.
७. इतरांना साहाय्य करणे
त्यांच्या घरापासून आमचे रहाण्याचे ठिकाण साधारण १४ कि.मी. दूर होते. आम्हाला जाण्या-येण्यासाठी वाहनाची अडचण येत होती. त्या वेळी गुरुजी स्वतःहून आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही माझी दुचाकी वापरू शकता.’’ तेव्हा त्यांनी आम्हाला त्यांची दुचाकी वापरायलाही दिली.’ – श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार
८. देहभान हरपून सेवा करणे
‘गुरुजींची देहबुद्धी अत्यल्प आहे. याचा आम्हाला अनुभव आला. एकदा ते एका सेवेसाठी बाहेर जाऊन आले. तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो, ‘‘आपण जेवून घेऊया.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘हो, आपण जेवून मूर्ती बनवणे चालू करूया.’’ आम्ही जेवायला बसलो आणि ते सेवेचे कपडे घालून तसेच मूर्ती बनवण्याच्या सेवेच्या ठिकाणी जाऊन बसले. सायंकाळी ५ वाजता त्यांना भूक लागल्याची जाणीव झाली आणि ते मला म्हणाले, ‘‘मी जेवलोच नाही.’’ ‘मी जेवून येतो’, असे म्हणून त्यांनी गोल फिरून आम्ही करत असलेली मूर्ती पाहिली आणि पुन्हा मूर्तीसेवा चालू केली. ५ मिनिटांनी मी त्यांना विचारले, ‘‘गुरुजी, तुम्ही जेवायला जाणार होता ना ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘हो. पुन्हा विसरलो.’’ यावरून ‘ते सेवेशी किती एकरूप होतात ?’, हे शिकायला मिळाले. त्यांना देहाची जाणीव नसते. ते देहभान आणि तहान-भूक विसरून सेवेशी एकरूप होतात.
९. अहं अल्प असणे
आतापर्यंत त्यांनी सहस्रो मूर्ती बनवल्या आहेत; पण त्याचा त्यांना अहंकार नाही.’- श्री. रामानंद परब
१०. गुरूंचे आज्ञापालन करणे
१० अ. श्री गुरूंनी सांगितलेल्या मुलीशी विवाह करणे : ‘गुरुजी म्हणाले, ‘‘माझा विवाह श्री गुरूंनीच (श्री बाबा महाराज यांनी) करून दिला आहे. मला अनेक श्रीमंत कुटुंबातल्या, गाडी-बंगला असलेल्या मुलींनी लग्नाची मागणी घातली होती; पण माझ्या गुरूंनी सांगितले, ‘‘तुझा विवाह मी करणार.’’ त्यामुळे मी त्या सर्व मुलींना नाकारले. गुरूंनी ज्या मुलीशी माझा विवाह करून दिला, त्या मुलीची परिस्थिती एवढी गरिबीची होती की, तिला नेसायला चांगली साडीही नव्हती. मी तिला साडी देऊन तिच्या गळ्यात अर्ध्या ग्रॅमचे मंगळसूत्र घालून तिच्याशी लग्न करून घरात आणले. ती स्वभावाने फार छान आणि शांत आहे. तिने कधीच माझ्याकडे काही मागितले नाही. तिच्यामुळेच आज मी एवढ्या मूर्ती करू शकलो आणि इथपर्यंत पोचू शकलो.’’ हा प्रसंग ते मला सांगत असतांना त्यांची भावजागृती होऊन त्यांच्या डोळ्यांतून अखंड अश्रू वहात होते.
नंतर ते म्हणाले, ‘‘पूर्वीच्या स्त्रिया नऊवारी साडी नेसायच्या. पूर्ण अंगभर कपडे घालायच्या; पण आज त्याच्या विरुद्ध आहे. आजच्या स्त्रिया राक्षसांप्रमाणे कपडे घालतात.’’
१० आ. गुरुजींना श्री गुरूंनी (श्री बाबा महाराज यांनी) सांगितल्याप्रमाणे सिद्धींचा वापर न करणे : गुरुजींना सिद्धी प्राप्त आहे. त्यांनी कुणाला काही सांगितले, तर ते खरे होते. एकदा एका व्यक्तीचा विवाह जमत नव्हता. गुरुजींनी त्याला एका देवतेची उपासना करण्यास सांगून ‘तुझा विवाह होईल’, असे सांगितले. त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा विवाह झाला. हे गुरुजींच्या श्री गुरूंना (श्री बाबा महाराज यांना) कळले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तुझा जन्म केवळ मूर्ती बनण्यासाठी झाला आहे. तू सिद्धीचा वापर करू नकोस.’’ तेव्हापासून गुरुजींनी त्याविषयी सांगणे बंद केले.
११. गुरुजींच्या आजोबांनाही सिद्धी प्राप्त असणे आणि त्यांना स्वतःच्या मृत्यूची वेळ अचूकपणे ठाऊक असणे
गुरुजींचे आजोबा १०५ वर्षे जगले. त्यांना ‘स्वतःचा मृत्यू कधी होणार ?’, हे आधीच ठाऊक होते. त्यांनी घरच्यांना आधीच सांगून ठेवले होते, ‘‘अमुक दिवशी मी जाणार.’’ तो दिवस आल्यावर ते म्हणाले, ‘‘आज तुळशीची पूजा आहे. पूजा करून नैवेद्य आणि जेवण करून घ्या.’’ त्यानंतर पूजा करून जेवण झाल्यानंतर दुपारनंतर ते म्हणाले, ‘‘आता मला स्नान घाला. मला जायला लागेल. माझी वाट पहात आहेत.’’ त्यांना स्नान घालून अंथरुणावर आणून झोपवल्यावर त्यांनी सर्वांना सांगून सांगितलेल्या वेळी प्राण सोडला. गुरुजी म्हणाले, ‘‘त्यांनाही सिद्धी प्राप्त होती.’’
१२. केवळ एका रात्रीत मूर्ती घडवण्याचे कौशल्य
१२ अ. काणकोण (गोवा) येथील श्रीकृष्ण मंदिरात स्थापन करण्यासाठी राजस्थानमधून श्रीकृष्णाची संगमरवरी मूर्ती बनवून आणणे, ती ‘जलाधिवास’ या विधीच्या वेळी दुभंगणे आणि ग्रामदेवतेने ‘कारवार येथील श्री. नंदा आचारी एका दिवसात मूर्ती बनवून देऊ शकतात’, असा कौल देणे : काणकोण (गोवा) येथे श्रीकृष्णाचे एक मंदिर आहे. त्या मंदिरात श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन करण्यासाठी राजस्थानहून संगमरवरी दगडाची श्रीकृष्णाची एक मूर्ती बनवून आणली होती. तिच्या प्रतिष्ठापनेचा विधी ३ दिवस होता. पहिल्या दिवशी ‘जलाधिवास’ हा विधी असतो. या विधीच्या वेळी मूर्ती पाण्यात ठेवल्यावर ती दुभंगली. तेव्हा गावकर्यांना ‘परवा प्रतिष्ठापना आहे आणि आज विधी चालू असतांना मूर्ती दुभंगली. आता काय करायचे ?’, असा प्रश्न पडला. गावकर्यांनी काणकोणचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन याला कौल लावला. देवाने कौल दिला, ‘कारवार येथे श्री. नंदा आचारी नावाचे एक मूर्तीकार आहेत. तेच तुम्हाला एका दिवसात मूर्ती बनवून देऊ शकतात.’
१२ आ. तेथील ब्राह्मणांनी ‘मूर्ती वेळेत घडवल्यास गुरुजींचा हार घालून सत्कार करू’, असे सांगणे आणि गुरुजींनी एका रात्रीत अन् वेळेपूर्वीच तशी मूर्ती घडवून दिल्यावर ब्राह्मणांनी त्यांचा हार घालून सत्कार करणे : ग्रामदेवतेने दिलेला कौल ऐकून गावकरी दुपारी ४ वाजता गुरुजींकडे पोचले. त्यांनी गुरुजींना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. गावकरी म्हणाले, ‘‘उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत आम्हाला स्थापनेसाठी मूर्ती हवी आहे. ती मिळेल ना ?’’ गुरुजी त्यांना म्हणाले, ‘‘मिळू शकते.’’ सव्वादोन फूट उंचीची श्रीकृष्णमूर्ती बनवायची होती. गुरुजींनी वज्रशिळेमध्ये ती मूर्ती सायंकाळी ५ वाजता बनवायला चालू केली आणि सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण केली. काणकोणच्या ब्राह्मणांनी त्यांना सांगितले होते, ‘‘त्यांनी जर ही मूर्ती आम्हाला वेळेत दिली, तर आम्ही जाऊन त्यांना हार घालू.’’ प्रत्यक्षात ब्राह्मणांनी दिलेल्या वेळेच्या पूर्वी १ घंटा ती मूर्ती गुरुजींनी पूर्ण करून दिली. तेव्हा काणकोणच्या ब्राह्मणांनी कारवार येथे गुरुजींच्या घरी जाऊन त्यांचा हार घालून सत्कार केला.
१३. अनासक्त
१३ अ. घडवलेल्या मूर्तींतून गुरुजींनी कोट्यवधी रुपये मिळवले असले, तरीही ‘पैशांविषयी आठवण यायला नको’, यासाठी गुरुजींचे अधिकोषात खाते नसणे आणि मूर्ती घडवून मिळालेले धन न साठवता समाजोपयोगी कार्य करण्यासाठी वापरणे : त्यांनी घडवलेल्या मूर्तींचे त्यांना जे काही पैसे मिळाले, इतक्या वर्षांत ते त्यांनी कधीच स्वतःजवळ ठेवले नाहीत. त्यांनी त्यांचा वापर इतरांना साहाय्य करण्यासाठी केला. त्यांनी ३० जणांचे विवाह करून दिले, तसेच अनेक गरिबांना आर्थिक साहाय्य केले. त्यांनी सांगितले, ‘‘आतापर्यंत त्यांनी घडवलेल्या मूर्तींतून त्यांनी कोट्यवधी रुपये मिळवले आहेत, तरीही त्यांचे अधिकोषात खाते नाही. अधिकोषात खाते असल्यावर आपल्याला पैशांची आठवण होत रहाते. मला पैशांविषयी कसलीच आठवण नको; म्हणून माझे अधिकोषात खाते नाही.
– श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार
१३ आ. सोनार असलेल्या एका व्यक्तीने एका मंदिराचे चांदीचे दार आणि चौकट गुरुजींकडून बनवून घेणे, गुरुजींना चांदीचे मूल्य अल्प सांगून फसवणे, त्यांची चेष्टा करणे, मात्र गुरुजींनी ‘तुम्हाला पैसे द्यायचे नसल्यास देऊ नका; पण चेष्टा करू नका, मी ‘ते पैसे देवाला अर्पण केले आहेत’, असे समजेन’, असे सांगणे : ‘गुरुजींनी एका मंदिराचे चांदीचे दार आणि चौकट बनवली. त्याला अडीच किलो चांदी लागली. चौकटीचे काम देणारी व्यक्ती सोनारच होती. गुरुजींनी काम चालू केले, तेव्हा चांदी ४८ सहस्र रुपये प्रतिकिलो होती. त्या व्यक्तीने गुरुजींना ‘४० सहस्र रुपये प्रतिकिलोने चांदी घेतली ना ?’, असे चेष्टेने विचारले. प्रत्यक्षात ती व्यक्ती स्वतः सोनार असूनही गुरुजींना फसवत होती. त्या व्यक्तीने गुरुजींना ४० सहस्र रुपयांना फसवले. एवढेच नाही, तर ती व्यक्ती भ्रमणभाषवर गुरुजींची चेष्टा करत होती. गुरुजींनी तिला स्पष्टपणे सांगितले, ‘‘तुम्हाला पैसे द्यायचे नसल्यास देऊ नका; पण अशी चेष्टा करू नका. मी ‘ते पैसे देवाला अर्पण केले आहेत’, असे समजेन.’’ – श्री. रामानंद परब
१४. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता – ‘कोणत्या देवतेची मूर्ती कोणत्या दगडापासून घडवायला पाहिजे ?’, हे गुरुजींना त्या दगडाला स्पर्श करताक्षणी कळणे
‘मूर्ती घडवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या मूर्तीला विशिष्ट प्रकारचा दगड लागतो, उदा. कृष्णशिळा, वज्रशिळा, शाळिग्राम, संगमरवर इत्यादी. ‘कोणत्या देवतेची मूर्ती कोणत्या दगडापासून घडवायला पाहिजे ?’, हे गुरुजींना त्या दगडाला स्पर्श करताक्षणी कळते. त्या दगडाला स्पर्श केल्यावर त्या दगडातून जाणवणारी स्पंदने जी मूर्ती घडवायची आहे, त्या देवतेच्या स्पदनांशी जुळली पाहिजेत. त्या स्पंदनांद्वारे त्यांना ‘त्या मूर्तीसाठी तो दगड चालेल का ?’, याची आतून जाणीव होते. तो दगड त्या देवतेच्या मूर्तीसाठी योग्य नसेल, तर दगडातून जाणवणारी स्पंदने त्यांच्या मनातील मूर्तीच्या स्पंदनांशी जुळत नाहीत.’ – श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार
१५. भाव
१५ अ. ‘देवाच्या नामजपाची गोळी’ हेच औषध आहे’, असा भाव असल्याने अनेक दुखणी असूनही आणि वय अधिक असूनही सतत उत्साही अन् आनंदी असणे : ‘गुरुजींना मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे. मूर्ती बनवतांना दगडाची जी पूड उडते, त्यापासून त्यांच्या यकृतामध्ये (लीव्हरमध्ये) एक खडा निर्माण झाला आहे. या सर्व दुखण्यांवर ते औषध घेतात. यकृतामध्ये झालेल्या खड्यासाठी वैद्यांनी त्यांना शस्त्रकर्म करण्यास सांगितले आहे आणि त्याचा व्यय ८० सहस्र रुपये एवढा आहे. ‘त्यांचे वय अधिक (वय ८० वर्षे) असल्यामुळे शस्त्रकर्माने अधिक लाभ होईल’, असेही नाही. यासाठी आधुनिक वैद्यांनी त्यांना औषधे चालू केली आहेत; मात्र ते कोणतेही पथ्य पाळत नाहीत. ते म्हणतात, ‘‘भगवंताच्या नामाची गोळी घेत असतांना पथ्य पाळण्याची आवश्यकताच काय ?’’ त्यांच्याकडे पाहून ‘त्यांना दुखणी आहेत किंवा दुखण्यामुळे ते थकले आहेत’, असे जाणवत नाही, तसेच ‘त्यांचे वय ८० वर्षे आहे’, असेही त्यांच्याकडे पाहून वाटत नाही.
१५ आ. गुरुजींमधील भावामुळे देवीने स्वतः त्यांना मूर्ती घडवण्याविषयी मार्गदर्शन करणे
१५ आ १. भटकळ येथील मंदिरात स्थापना करण्यासाठी श्री पद्मावतीदेवीची मूर्ती घडवतांना देवीने स्वतःच गुरुजींना मूर्ती घडवण्याविषयी मार्गदर्शन करणे, त्याप्रमाणे सर्व आचार पाळून देवीची मूर्ती घडवण्यास १५ वर्षे लागणे आणि ती मूर्ती पुष्कळ जागृत असणे : भटकळ येथे श्री पद्मावतीदेवीचे मंदिर आहे. त्या मंदिरात मूर्ती स्थापन करण्यासाठी श्री पद्मावतीदेवीची मूर्ती घडवण्यास गुरुजींनी वयाच्या २५ व्या वर्षीच आरंभ केला. त्यांनी वज्रशिळेमध्ये श्री पद्मावतीदेवीची ७ फूट उंचीची मूर्ती घडवायला आरंभ केला. प्रारंभी त्यांना त्या वज्रशिळेतून मूर्ती घडवत असतांना आवाज ऐकू येऊ लागला. ‘ती मूर्ती आपल्याशी बोलत आहे’, असे त्यांच्या लक्षात आले. ती मूर्तीच त्यांना मूर्ती बनवण्याविषयी मार्गदर्शन करू लागली आणि देवीनेच त्यांच्याकडून ती मूर्ती बनवून घेतली. त्या देवीने त्यांना सांगितले होते, ‘दिवसाला केवळ एक घंटाच मूर्ती बनवायची.’ अशा प्रकारे सर्व नियमांचे पालन करून ती मूर्ती घडवायला त्यांना १५ वर्षे लागली. गुरुजी म्हणाले, ‘‘ती मूर्ती पुष्कळ जागृत आहे. तिच्या डोक्यावर नागाचा फणा आहे. त्यावर तेथील पुजारी सुपारी ठेवतात. एखादा भक्त मनात एखादी इच्छा घेऊन तिच्यासमोर आला आणि ती इच्छा पूर्ण होणार असेल, तर ती सुपारी त्या भक्ताच्या हातात पडते.’
१५ आ २. श्री पद्मावतीदेवीची मूर्ती भटकळ येथे प्रतिष्ठापनेसाठी नेण्यासाठी ४० माणसांनी उचलल्यावरही ती जागेवरून न हलणे आणि साधू-संतांनी मूर्तीच्या ठिकाणी येऊन मंत्रसामर्थ्याने अग्नि प्रज्वलित करून यज्ञ-याग केल्यावर १५ माणसांनी ती मूर्ती उचलून भटकळ येथे नेणे : ‘गुरुजींनी कारवार येथे त्यांच्या घरी श्री पद्मावतीदेवीची मूर्ती बनवली. त्यानंतर ती मूर्ती भटकळ येथे प्रतिष्ठापनेसाठी नेण्यासाठी उचलण्याचा प्रयत्न केल्यावर ती जागेवरून हलत नव्हती. भटकळ येथून ४० माणसे मूर्ती उचलण्यासाठी आली, तरीही ती मूर्ती जागेवरून हलेना. शेवटी साधू-संतांनी मूर्तीच्या ठिकाणी येऊन मंत्रसामर्थ्याने अग्नि प्रज्वलित केला आणि यज्ञ-याग केले. त्यानंतर १५ माणसांनी ती मूर्ती उचलून भटकळ येथे नेली. (क्रमश:)
– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि श्री. राजू सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२०)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/625164.html
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |