‘सेन्सॉर बोर्डा’मध्ये धार्मिक प्रतिनिधी हवेत !
अभिनेते अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ (चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीचा संक्षिप्त व्हिडिओ) नुकताच यू ट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रगुप्त आणि यम देवता यांची टिंगल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या शौर्याची गाथा सांगणारा ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ नुकताच प्रदर्शित झाला; पण या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याची तक्रार बांदल वंशजांनी केली आहे.
आतापर्यंत ‘पीके’, ‘ओ माय गॉड’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘तांडव’ यांसारख्या अनेक चित्रपट अन् वेब सिरीज यांमधून हिंदु धर्म, देवता, साधूसंत यांना लक्ष्य केले गेले. हिंदूंच्या प्रथा-परंपरा यांविषयी विनोद करून घृणा निर्माण केली जाते. हिंदूंच्या धार्मिक संकल्पना आणि देवता यांची टिंगल करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मधून काही दृश्ये अन् संवादच समोर येतात. त्यावरून प्रेक्षकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारी प्रविष्ट होतात. प्रत्यक्षात पूर्ण चित्रपटात आणखी आक्षेपार्ह संवाद असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा (सेन्सॉर बोर्ड)’त प्रमाणपत्र देण्यासाठी चौकशी समिती, फेरविचार समिती आणि अपिलीय समिती अशा ३ समित्या कार्यरत असतात. असे असतांनाही अश्लील चित्रीकरण अन् आक्षेपार्ह संवाद चित्रपटात कसे काय रहातात ? ते का वगळले जात नाहीत ? कि चित्रपट निर्माते आणि ‘सेन्सॉर बोर्ड’ यांच्यात काही साटेलोटे असते ? चित्रपटात हिंदु धर्म, देवता यांचे विडंबन करायचे, इतिहासाची मोडतोड करायची आणि चित्रपट वादात घालून प्रसिद्धी मिळवायची, असा काहीसा प्रकार चित्रपटक्षेत्रात चालू आहे का ? असे सर्वसामान्य नागरिकांना वाटल्यास त्यात वावगे काय ?
एखादा चित्रपट प्रदर्शित होऊन धार्मिक भावना दुखावल्या म्हणून गुन्हा नोंद झाल्यास निर्मात्यांसह ‘सेन्सॉर बोर्डा’च्या सदस्यांवरही योग्य ती कारवाई व्हायला हवी. अन्यथा ‘सेन्सॉर बोर्डा’ची आवश्यकता काय ? यावर एकमेव पर्याय म्हणजे ‘सेन्सॉर बोर्डा’चे परिनिरीक्षण करायला हवे. ‘सेन्सॉर बोर्डा’मध्येही धार्मिक प्रतिनिधी असायला हवेत, जे धार्मिक भावनांचा अनादर होऊ नये, याची काळजी घेतील !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव