शिवसेनेच्या दोन्ही गटांना म्हणणे सादर करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाकडून १ मासाचा कालावधी !
मुंबई – शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. सद्यस्थितीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी आपला गट ‘खरी शिवसेना’ असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी दोन्ही पक्ष सर्वाेच्च न्यायालयात गेले असून या प्रकरणी १ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने दोन्ही पक्षांना त्यांचे लिखित म्हणणे मांडण्यासाठी १ मासांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे ही सुनावणी डिसेंबर मासात होईल.
यासाठी सर्वाेच्च न्यायालयाकडून ५ जणांचे घटनापीठ स्थापन केले असून दोन्ही पक्षांनी त्यांचे म्हणणे कागदपत्रांवर घटनापिठाला सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. दोन्ही पक्षांकडून त्यांचे म्हणणे आल्यानंतर न्यायालय सुनावणीची तारीख देणार आहे. १६ डिसेंबरनंतर नाताळची सुटी चालू होणार आहे. त्यापूर्वी ही सुनावणी न झाल्यास ही सुनावणी पुढील वर्षात जाण्याची शक्यता आहे. सध्या न्यायमूर्ती उदय लळीत हे सरन्यायाधीश आहेत. ही सुनावणी पुढील वर्षात गेल्यास सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची वर्णी आहे.