सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांना लाच स्वीकारतांना अटक !
भ्रष्टाचाराने पोखरलेला शिक्षण विभाग !
सोलापूर – जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांना ३१ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या कार्यालयात २५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. तक्रारदारांची शाळा आहे. त्यांनी शाळेचे ८ वी ते १० वीचे वर्ग वाढवण्याविषयी शिक्षण विभागाच्या ‘ऑनलाईन’ असलेल्या ‘यु डायस प्लस’ (यु डायस म्हणजे शिक्षणासाठी एकत्रित जिल्हा माहिती प्रणाली) या प्रणालीमध्ये अर्ज केला होता. या प्रस्तावावर स्वाक्षरी करून पुणे येथील शिक्षण संचालक यांच्या कार्यालयात पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे ५० सहस्र रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयीची तक्रार केली होती. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याविरुद्ध सदरबझार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.
सकाळी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ आणि सायंकाळी लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक !
विशेष म्हणजे शिक्षणाधिकारी लोहार यांना अटक होण्याच्या आदल्या दिवशी (३० ऑक्टोबर) महाबळेश्वर येथे मंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला होता. ३१ ऑक्टोबर या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त लोहार यांनी कर्मचार्यांसमवेत भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली आणि सायंकाळी ५ वाजता लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.