येत्या वर्षभरात राज्यातील ५ लाख युवकांना रोजगार देऊ ! – मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकासमंत्री
मुंबई – येत्या ६ मासांत राज्यातील ग्रामीण भागात १ सहस्र कौशल्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत. येत्या वर्षभरात राज्यातील ५ लाख युवकांना रोजगार देण्यात येईल, असे आश्वासन कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. १ नोव्हेंबर या दिवशी एलफिन्स्टन टेक्निकल महाविद्यालयात कौशल्य विद्यापिठाच्या शिक्षणाला प्रारंभ करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात बोलतांना लोढा यांनी वरील माहिती दिली.
या वेळी नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ रिचर्ड जे. रॉबर्ट्स, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन्., तसेच विद्यापिठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या वेळी मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य विद्यापिठे यापुढे शहरकेंद्रीत रहाणार नाहीत. ग्रामीण भागातही कौशल्य विद्यापिठांच्या अभ्यासक्रमांना चालना देण्यात येईल. कौशल्य विद्यापिठाचा अभ्यासक्रम मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांत असेल, तसेच ‘वर्ष २०२४ पूर्वी या विद्यापिठासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात येईल’, असे सांगितले. महाराष्ट्राने कौशल्य विकासाच्या कामात चांगली आघाडी घेतली असल्याचे या वेळी राज्यपालांनी म्हटले.