अकोला येथे लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते अनावरण !
अकोला – येथील महापालिकेच्या बाजूला असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार रणधीर सावरकर, भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, संजय बडोणे, उषा विरक, राजेंद्र गिरी, किशोर पाटील, माजी महापौर अर्चना मसने उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे उदय महा, अमोल चित्राळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन आमदार गोवर्धन शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला युवकांची उपस्थिती मोठ्या संख्येत होती.
१. आरंभीच्या काळात हा पुतळा अर्धाकृती होता. महानगरपालिकेच्या जवळ असूनही तो अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. पुतळ्याच्या अवतीभवती कचर्याचा ढिग असायचा. तेथे चिखल साचला होता.
२. १ ऑगस्ट २०२२ या लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अकोल्यातील ज्येष्ठ नागरिक श्री. शशिकांत पांडे यांनी पुतळ्याची दुरवस्था पाहून स्वतः स्वच्छता करण्यास आरंभ केला. ते पाहून अन्य राष्ट्रप्रेमीही स्वच्छतेसाठी एकत्र आले. पुतळ्याच्या दुरुस्तीविषयी त्यांनी महानगरपालिकेत जाऊन निवेदन केले.
३. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे उदय महा आणि अन्य सदस्य यांनी भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या साहाय्याने पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण केले.
४. प्रमुख वक्ते आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहर अध्यक्ष श्री. सुधीर देशपांडे यांनी लोकमान्य टिळक यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारे काही प्रसंग भाषणातून सांगितले.
५. पुतळ्यासाठी सहकार्य केलेल्यांचा सत्कार आणि काहींचा नामोल्लेखही करण्यात आला. ‘या परिसराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे’, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
संपादकीय भूमिकाराष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्दशेकडे कानाडोळा करणार्या प्रशासनातील अधिकार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! |