वारसास्थळांना पुनरुज्जीवन कधी ?
पुण्याच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा शनिवारवाडा पहाण्यास जगाच्या कानाकोपर्यातून पर्यटक येतात. वाडा बाहेरून भव्य दिसत असला, तरी आतून दुरवस्थेला पोचला आहे. वाड्याच्या आतील भागांमध्ये कचरा साठला आहे, जळमटे लागली आहेत, ढासळलेले दगड, जुनाट झालेली लाकडे अशा प्रकारे शनिवारवाड्याची दुरवस्था झाली आहे. शनिवारवाड्याच्या पटांगणात होणारे कार्यक्रम पुणेकरांना अभिमानास्पद आहेत; पण वाड्याच्या या अवस्थेविषयी कुणालाच काही वाटत नाही, ही शोकांतिका आहे.
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून झालेल्या नूतनीकरणावर आता धूळ आणि जळमटे बसली असून या वाड्यांचे वैभव जपण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना पुरातत्व विभाग अन् महापालिका यांच्याकडे नसल्याचे या वास्तूंच्या दुर्दशेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ऐतिहासिक वास्तू आणि दुर्मिळ वस्तू यांचा ठेवा सांभाळण्यासाठी इतर राज्यांनी प्रयोगशाळा चालू केल्या. एन्.आर्.एल्.सी. ही राष्ट्रीय संवर्धन संस्था असून भारतात कोणत्याही ठिकाणी या संस्थेच्या वतीने ऐतिहासिक वास्तू आणि दुर्मिळ वस्तू यांच्या जतनासाठी अद्ययावत् प्रयोगशाळेची उभारणी करता येते. त्यासाठी केवळ राज्याकडून तसा प्रस्ताव जावा लागतो. हा प्रस्तावच अजून महाराष्ट्राकडून गेलेला नाही. आज इतर राज्ये त्यांच्या ऐतिहासिक वास्तू आणि दुर्मिळ वस्तू यांच्या जतनासाठी प्रयोगशाळा संपन्न असतांना महाराष्ट्र मात्र प्रयोगशाळेविना आहे. महाराष्ट्रानेही या संस्थेचा लाभ घेऊन ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच गडप्रेमींची अपेक्षा आहे. शनिवारवाड्यासारखी इतरही अनेक वारसास्थळे गावोगावात पहायला मिळतात त्यांचेही आज शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन करणे आवश्यक आहे. आताच सावध होऊन ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन न केल्यास त्या नामशेष होण्यास वेळ लागणार नाही.
याउलट विदेशात अशा जागा शेकडो वर्षांपासून अत्यंत संवेदनशीलतेने जपलेल्या आहेत. पुरातत्व विभाग सक्षम आणि समाजाभिमुख झाला, तरच अधिकाधिक वारसास्थळांना पुनरुज्जीवन मिळेल, अन्यथा कित्येक ऐतिहासिक वास्तू अशाच धूळ खात पडून रहातील. ऐतिहासिक वास्तूंचा नुसता अभिमान बाळगून उपयोग नाही, तर त्या वास्तू टिकवण्यासाठी, पुढच्या पिढीला त्याचे महत्त्व सांगण्यासाठी त्याला जपण्याचे दायित्वही आपलेच आहे.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे