‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग ३)’ या ग्रंथाचे प्रकाशन
‘भजनातील केवळ मधुरता आणि लय पाहू नका, तर भजनाचा अर्थ समजून घेऊन भजन म्हणा !’ – प.पू. भक्तराज महाराज
रामनाथी (गोवा) – सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग ३)’ या ग्रंथाचे प्रकाशन प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य आणि सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते येथील सनातनच्या आश्रमात २६ ऑक्टोबर २०२२ या दिवशी (दिवाळी पाडव्याला) करण्यात आले. प्रकृती ठीक नसतांनाही त्यांनी हे प्रकाशन केले.
या ग्रंथातील भजनांच्या भावार्थांचे लेखन सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी यांनी केले असून त्यांच्या कन्या सौ. उल्का नितीन बगवाडकर यांनी त्यांना साहाय्य केले आहे.
भजनांचा सुगम अर्थबोध करून देऊन भजनानंदी डुंबवणारा ग्रंथ !
‘माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) म्हणत असत, ‘भज मन’, म्हणजे ‘जे मनाला भजवते, रिझवते’, ते ‘भजन’ ! प.पू. बाबा जेव्हा भजने म्हणायला आरंभ करत असत, तेव्हा काही क्षणांतच ते भजनांशी पूर्णपणे एकरूप होत असत. ते भक्तांना नेहमी सांगत, ‘भजनातील केवळ मधुरता आणि लय पाहू नका, तर भजनाचा अर्थ समजून घेऊन भजन म्हणा.’ याचे कारण म्हणजे, अर्थ समजून घेऊन भजन म्हटले, तर ते भावपूर्ण म्हटले जाते. यामुळे भक्तीरसात डुंबण्याचा आनंद घेता येण्यासह चित्त चैतन्याशी जोडले जाते. यासाठीच प.पू. बाबा काही वेळा भजने म्हणतांना मध्ये मध्ये भजनांचा अर्थही समजावून सांगत. काही वेळा भक्त भावपूर्ण भजने म्हणत नसले, तर प.पू. बाबा त्यांना ‘भजनांचा अर्थ समजून घेऊन ती अंतःकरणापासून म्हणा’, असे रागावून सांगत असत. भजनांचा अर्थ समजून घेऊन ती म्हणण्याचे महत्त्व प.पू. बाबांनी भक्तांवर एवढे बिंबवले होते !
प.पू. बाबांचे प्रिय भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी यांनी प.पू. बाबांच्या प्रासादिक वाणीतून प्रकटलेले भजनांचे अर्थ वेळोवेळी टिपून ठेवले असल्यानेच हा सुंदर अन् पवित्र ग्रंथ सिद्ध झाला आहे. प.पू. बाबांची ही भक्तीगाथा समष्टीला समजवण्यासाठी दादांनी केलेली ही ग्रंथसेवा अक्षरशः अनमोल आहे. यासाठी मी दादांप्रती कृतज्ञ आहे.
‘या ग्रंथाच्या माध्यमातून साधक आणि भक्त यांना भजनांचे अर्थ नीट समजून त्यांना प.पू. बाबांच्या भजनामृताचा आस्वाद घेता यावा अन् त्यायोगे त्यांची साधनापथावरील वाटचाल अधिक चांगली व्हावी’, अशी प.पू. बाबांच्या चरणी प्रार्थना !’
– डॉ. जयंत आठवले (प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य) (११.८.२०२२)