केडगाव (जिल्हा पुणे) येथे राष्ट्रभक्तीचे कार्य करणार्या ‘स्वयंभू’ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला !
सनातन संस्था निर्मित ‘हलाल जिहाद’ ग्रंथाचेही प्रकाशन !
केडगाव (जिल्हा पुणे), ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते पुणे येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचारमंचा’च्या ‘स्वयंभू’ दिवाळी अंकाचे प्रकाशन सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात पार पडले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचारमंच’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी स्वयंभू दिवाळी अंकाची निर्मिती केली जाते. ग्रामीण भागातील नवोदित लेखक आणि कवी यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य स्वयंभू दिवाळी अंक गेली १९ वर्षे करत आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारधारेचा प्रसार आणि राष्ट्र साधना, तसेच राष्ट्रभक्तीचे कार्यही या दिवाळी अंकाच्या माध्यमातून होत आहे. या वेळी सनातन संस्था निर्मित ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाचेही प्रकाशन करण्यात आले.
या वेळी बोलतांना श्री. सुनील घनवट यांनी हलाल अर्थव्यवस्था देशासाठी कशी घातक आहे ? हे स्पष्ट केले. ते म्हणाले की, हलाल अर्थव्यवस्थेमधून उभा राहिलेला पैसा जगभरामध्ये अशांतता पसरवणे आणि इस्लामचा प्रसार यांसाठी वापरला जात आहे. भारताच्या सर्वभौमत्वाच्या दृष्टीने हे अतिशय धोकादायक आहे.
या वेळी केडगावचे सरपंच श्री. अजित शेलार पाटील, पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस श्री. तानाजी दिवेकर, श्री. बाप्पू खेत्रे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत डिंबळे, श्री. महेश पाठक, सौ. अर्चना घनवट आणि कु. क्रांती पेटकर, तसेच श्री. राजू गायकवाड, श्री. उमेश बारवकर आणि सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंचाचे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चि. शुभम लव्हे, श्री. अभिषेक परदेशी, चि. सचिन बनसोडे, श्री. प्रशांत पवार आणि ‘समर्थ मंडळ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रा’च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी श्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रकाश देशमुख सर, तर दिवाळी अंकाचे प्रास्ताविक डॉ. नीलेश लोणकर यांनी केले. कु. दयानंद बंडगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री. संदीप टेंगले सर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचा शेवट संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणून करण्यात आला.