सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
फोंडा (गोवा), ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांनी ३० ऑक्टोबरच्या दुपारी ४.२७ वाजता रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला. त्यांच्या पार्थिवावर ३१ ऑक्टोबर या दिवशी फोंडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कार करण्याआधी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव येथील सनातनच्या आश्रमात ठेवण्यात आले होते. या वेळी त्यांचे पुत्र श्री. सुरेंद्र, श्री. राम, कन्या कु. दीपाली, तसेच अन्य नातेवाइक उपस्थित होते. या प्रसंगी प्रकृती अस्वास्थ्य असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनीही पू. होनपकाका यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. आश्रमातील सर्व संत आणि साधक यांनीही भावपूर्ण दर्शन घेतले. पू. होनपकाकांमधील चैतन्यामुळे सर्व साधकांना या वेळी विविध अनुभूती आल्या.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना पू. (कै.) पद्माकर होनप यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती१. ‘पू. (कै.) पद्माकर होनप यांच्या डोळ्यांची उघडझाप होत आहे’, असे मला जाणवले. २. ‘त्यांच्या हृदयाची धडधड होत असून श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे मला जाणवले. ३.‘पू. होनपकाका यांचे आज्ञाचक्र, दोन्ही हात आणि पाय यांतून मोठ्या प्रमाणावर चैतन्याचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले. ४. ‘त्यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात चैतन्याचा प्रवाह येत असून तो वरच्या दिशेने वेगाने जात आहे’, असे मला दिसले. ५. मी आतापर्यंत अनेक संतांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे; परंतु अशा अनुभूती मला यापूर्वी कधीही आलेल्या नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (३१.१०.२०२२) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |