ज्याला चूल पेटवता येते, त्याला निरोगी रहाण्याचे मर्म समजते !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ८३
‘चूल पेटवतांना केवळ लहान कापट्या जाळल्या, तर भरभर जाळ होतो आणि पुनःपुन्हा कापट्या आत साराव्या लागतात. चूल नीट पेटण्यापूर्वीच मोठी लाकडे आत सारल्यास ती पेट घेत नाहीत; केवळ धूर मात्र होतो. त्यामुळे चूल पेटवायची असेल, तर आरंभी लहान कापट्या जाळल्या जातात. त्यांनी पेट घेतला की, मग हळूहळू मोठी लाकडे आत सारली जातात. एकदा का मोठ्या लाकडांनी नीट पेट घेतला की, ती मंद जळत रहातात. मग वारंवार इंधन आत सारावे लागत नाही.
जठराग्नीचेही (शरिराच्या पचनशक्तीचेही) अगदी असेच असते. जठराग्नीवरच आपले आरोग्य अवलंबून असते. जठराग्नीच्या संदर्भात ‘लहान कापट्या’, म्हणजे ‘पचायला हलके पदार्थ, उदा. लाह्या, मऊभात, वरणभात, घावन, तूप, तसेच सफरचंद, मोसंबी, कलिंगड यांसारखी सहज पचणारी फळे आणि बहुतेक भाज्या’. ‘मोठी लाकडे’, म्हणजे ‘पचायला जड पदार्थ, उदा. पोळी, कडधान्ये, दही, सुकामेवा, बटाटा, बीट, सुरण यांसारख्या कंदवर्गीय भाज्या, तसेच केळे, अंजीर, आंबा आणि फणस ही फळे’. केवळ हलके पदार्थ खात राहिल्यास वारंवार भूक लागत रहाते. भूक वाढू लागल्यावर टप्प्याटप्प्याने आहाराचे प्रमाण वाढवल्यास किंवा जड पदार्थांचा आहारात समावेश केल्यास दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्या मध्ये काही खाण्याची आवश्यकता रहात नाही. यामुळे स्वतःच्या पचनशक्तीचे अनुमान घेऊन आहाराचे प्रमाण आणि पदार्थ ठरवणे आवश्यक आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१०.२०२२)