साम्यवादी विचारसरणीचे लुला डा सिल्वा ब्राझीलचे नवे राष्ट्राध्यक्ष

ब्राझिलिया (ब्राझील) – लुला डा सिल्वा हे साम्यवादी विचारसरणीचे नेते ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत डा सिल्वा यांनी उजव्या विचारसरणीचे असलेले मावळते राष्ट्राध्यक्ष जेअर बोलसोनारो यांना पराभूत केले. डा सिल्वा यांना ५०.९ टक्के मते मिळाली, तर बोलसोनारो यांना ४९.१ टक्के मतांवर समाधान मानावे लागले.

१. ७७ वर्षीय डा सिल्वा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने वर्ष २०१८ मध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यामुळे वर्ष २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये पुराणमतवादी सामाजिक मूल्यांचे पुरस्कर्ते असलेले बोलसोनारो राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले होते.

२. आता डा सिल्वा यांना राजकीयदृष्ट्या अधिकाधिक ध्रुवीकरण होत चाललेल्या ब्राझिलियन समाजाला हाताळण्याचे काम करावे लागणार आहे, तसेच अर्थव्यवस्थेवरील आव्हाने आणि वाढती महागाई यांनाही तोंड द्यावे लागणार आहे.

३. या निकालामुळे लॅटिन अमेरिकेतील चिली, कोलंबिया आणि अर्जेंटिना यांच्यानंतर आता ब्राझिलमध्येही साम्यवादी विचारसरणीचे सरकार सत्तास्थानी आले आहे.