हिंदु धर्माच्या शिकवणुकीतून आपण खर्या धर्मनिरपेक्षतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
|
काठमांडू (नेपाळ) – हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आपण कुठे न्यून पडलो आणि आपण काय केले पाहिजे, याचे चिंतन केले पाहीजे. आम्हाला धर्मनिरपेक्षतेचे धडे शिकवणार्या युरोपीय आणि अमेरिकी राष्ट्रांनी मात्र त्यांच्या राष्ट्रांमध्ये ख्रिस्ती पंथातील कॅथोलिक, प्रोटेस्टंट, ऑर्थोडॉक्स इत्यादींना घटनात्मकरित्या संरक्षित केले आहे. हिंदु धर्माची शिकवण पाहिली, तर खर्या धर्मनिरपेक्षतेसाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ‘शांती सेवा आश्रमा’च्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या महोत्सवात ते मार्गदर्शन करत होते.
आरंभी व्यासाचार्य श्री. किशोर गौतम यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. ‘जय संगत आश्रमा’चे संस्थापक श्री. पुष्पराज पुरुष यांच्या प्रयत्नाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले. या प्रसंगी कृष्ण प्रणामी, इस्कॉन, नेपाल जैन परिषद आदी धार्मिक संघटना, तसेच ‘महेश संन्यासाश्रमा’चे रमणानंद स्वामी, बौद्ध गुरु श्री. ढक्के, ‘हिंदु योद्धा’चे श्री. प्रेमनिधी भारद्वाज, ‘व्यासाचार्य’ श्री. किशोर गौतम आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि संत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्व हिंदु महासंघाचे वरिष्ठ केंद्रिय उपाध्यक्ष श्री. शंकर खरेल यांनी केले.
१. या वेळी ‘नेपाल हिंदु परिषदे’चे अध्यक्ष श्री. संतोष पटेल यांनी नेपाळमध्ये धर्मांधांकडून होणार्या विविध आघातांविषयी अवगत केले.
२. ‘ॐकार एकता राष्ट्रीय धर्मसभे’च्या कार्यक्रमाचे संयोजक श्री. चिंतामणी योगी म्हणाले, ‘‘नेपाळी भाषा, वेशभूषा, नारी, संस्कृती, संस्कार आणि परंपरा वाचवण्यासाठी नेपाळला हिंदु राष्ट्र केले पाहिजे.
३. गणेश्वर धाम, देवघाटचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर आत्माराम महाराज म्हणाले, ‘‘आपल्याला राजकारणाला नाही, तर धर्माला गौरवान्वित करायचे आहे. आपल्याला हिंदु राष्ट्र कुणी भेट देणार नाही, तर ते संघर्ष करूनच मिळवावे लागेल.’’
शांती सेवा आश्रमचे संस्थापक श्री. चिंतामणी योगी यांनी हिंदु जनजागृती समितीविषयी काढलेले गौरवोद्गारशांती सेवा आश्रमचे संस्थापक श्री. चिंतामणी योगी यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे आश्रमात पोचताच त्यांची आनंदाने गळाभेट घेतली आणि उपस्थितांना त्यांची ओळख करून दिली. ते म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती भारतात फार चांगले कार्य करते, तसेच इतर संस्थांनाही सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करते. समितीचे कार्य सुनियोजित आणि शिस्तीचे आहे. समितीमध्ये अनेक उच्च शिक्षित कार्यकर्ते असून ते सर्वस्वाचा त्याग करून निःस्वार्थपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात पूर्णवेळ सेवारत आहेत. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेे अनेक वर्षांपासून शुद्ध भावाने नेपाळमध्ये येतात. त्यात कोणतेही राजकारण नाही.’’ |
‘कालिका एफ्.एम्.’च्या संचालिका रिना गुरूंग यांची घेतली सदिच्छा भेट
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘कालिका एफ्.एम्.’च्या संचालिका रिना गुरूंग यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी रिना गुरूंग म्हणाल्या, ‘‘तुमचे सिद्धांत योग्य नाहीत, तुम्ही माझ्याकडे या, असे म्हणणारा पंथ धर्म असूच शकत नाही. असे तर राजकीय पक्ष करत असतात ?’’ यावर सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘धर्म प्रेम शिकवतो. समाज सत्त्व-रज प्रधान असेल, तर शांती असते; परंतु तो रज-तम प्रधान असेल, तर संघर्ष असतो. त्यामुळे अशांती असते. समाज साधना करत नाही; म्हणून समाजात द्वेष आणि स्पर्धा आहे.’’
क्षणचित्र : या वेळी रिना गुरूंग म्हणाल्या की, समाजात अनेक लोक हिंदु धर्म आणि देवीदेवता यांवर टीका करतात. सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा सत्संग लाभल्यावर माझ्या मनातील शंका दूर होतात. आता मी हिंदु धर्मावर टिका करणार्यांना चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकेन.
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन !
आनंद मिळवण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
आपले मूळ स्वरूप सत् चित् आनंद आहे. त्यामुळे आपल्याला सततचे सुख, म्हणजे आनंद हवा असतो; परंतु आनंदी जीवन कसे जगायचे, हे आपल्याला कुठेच शिकवत नाही. त्यासाठी साधना, म्हणजे नामजप, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना केले. ‘चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’चे संचालक श्री. गोविंद जोशी यांनी ‘सनदी लेखापाल आणि स्पर्धात्मक परीक्षा’ यांची सिद्धता करणार्या विद्यार्थ्यांसाठी सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे ‘आनंदमय जीवनासाठी काय करावे ?’, या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते. या वेळी ‘शांती सेवा आश्रमा’चे संस्थापक श्री. चिंतामणी योगी उपस्थित होते. श्री. योगी यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.
‘मष्टो कुलदेवता प्रतिष्ठान’च्या सदस्यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले मार्गदर्शन !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘मष्टो कुलदेवता प्रतिष्ठान’च्या सदस्यांना मार्गदर्शन केले. या वेळी ‘मष्टो कुलदेवता प्रतिष्ठान’चे श्री. विष्णु बहाद्दूर खडका म्हणाले, ‘‘मी भारतातील अनेक संतांना भेटलो आहे. ते काय मार्गदर्शन करतात, हेच समजत नाही; परंतु सद्गुरु डॉ. पिंगळे हे अचूक आणि नेमकेपणाने मार्गदर्शन करतात.’’ सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या प्रेमभावाविषयी बोलतांना ते म्हणाले की, मी भारतात गेल्यावर सद्गुरु डॉ. पिंगळे यांना कधीही संपर्क करत नाही; परंतु ते नेपाळमध्ये आल्यावर मला आवर्जून संपर्क करतात आणि आम्हाला भेटतात.
‘हिमालिनी पत्रिके’च्या संपादिका डॉ. श्वेता दिप्ती आणि प्रबंध निर्देशक सच्चिदानंद मिश्रा यांची घेतली भेट
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘हिमालिनी पत्रिके’च्या संपादिका डॉ. श्वेता दिप्ती आणि प्रबंध निर्देशक श्री. सच्चिदानंद मिश्रा यांची भेट घेतली. या वेळी त्यांना ‘हलाल जिहाद’विषयी माहिती जाणून घेतली. या विषयावर तत्परतेने जागृती करण्यासाठी त्यांनी त्यांच्या ‘यू ट्यूब’ वाहिनीवर ‘हलाल जिहाद’ विषयावर सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा कार्यक्रम आयोजित केला.
श्री नि:शेषानंद महाराजांचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी गौरवोद्गारसद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी काभ्रे येथील विंध्यवासिनी आध्यात्मिक प्रतिष्ठानमध्ये श्री नि:शेषानंद महाराजांची भेट घेतली. श्री नि:शेषानंद महाराजांनी समितीच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. श्री नि:शेषानंद महाराज यांच्या वतीने नेपाळमध्ये विविध ठिकाणी गुरुकुल चालवण्यात येतात. याविषयी सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘गुरुकुल परंपरा सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी आवश्यक आहे.’’ |
‘विश्व हिंदु महासंघ, नारायणघाट’चे फुलनाथ नेऊरे आणि प्रेम गैरे यांच्याशी भेट
‘विश्व हिंदु महासंघ, नारायणघाट’चे श्री. फुलनाथ नेऊरे आणि श्री. प्रेम गैरे यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची भेट घेतली. या वेळी बोलतांना सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण ज्ञान परंपरेने होते. आपण धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्या गोष्टी करत असतांना आपला केंद्रबिंदू केवळ केवळ धर्मच असला पाहिजे.’’
‘इस्कॉन’ मंदिराचे स्वामी पेट्रो यांची घेतली भेट
नारायणघाट येथील ‘इस्कॉन’ मंदिराचे स्वामी पेट्रो यांच्याशी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची भेट झाली. या वेळी बोलतांना सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘श्रीकृष्णाने गीतेत दैवी संपदा, म्हणजे सद्गुण आणि आसुरी संपदा (स्वभावदोष) यांविषयी सांगितले आहे. साधकाला आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दोष घालवून चित्तशुद्धी करणे आवश्यक आहे.’’ ही भेट घडवून आणण्यास ममता न्यौपाने यांनी पुढाकार घेतला.
नेपाळमध्ये हिंदु राष्ट्र आणण्यासाठी संघर्षरत असलेले श्री. प्रेमनिधी भारद्वाज यांची घेतली भेट
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमध्ये हिंदु राष्ट्र आणण्यासाठी संघर्षरत असलेले श्री. प्रेमनिधी भारद्वाज यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी हिंदु राष्ट्रासाठी बलिदान देण्याची सिद्धता दाखवली. त्यावर सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘आपल्याला अभिमन्यू बनून बलीदान द्यायचे नाही, तर अर्जुन बनायचे आहे. भक्तांचा कधी बळी जात नाही; म्हणून भक्त बनले पाहिजे. एका भक्तासाठीही देवाला प्रकट व्हावे लागते. आपल्याला लढायचे नाही, तर देवाने आपल्याला माध्यम बनवून कार्य केले पाहिजे. ज्याची कुंडलिनी शक्ती आणि दिव्यता जागृत आहे, तो खरा जागृत आहे.’’
‘फोरम ऑफ नेपालीज जर्नालिस्ट’चे अध्यक्ष प्रा. निरंजन ओझा यांच्याशी भेट
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ३.०९.२२ या दिवशी ‘फोरम ऑफ नेपालीज जर्नालिस्ट’चे अध्यक्ष प्रा. निरंजन ओझा आणि ‘आदित्य वाहिनी’चे श्री. दर्शन पनेरू यांची भेट घेतली. शिक्षणव्यवस्थेविषयी बोलतांना श्री. ओझा म्हणाले, ‘‘सध्याची शिक्षणव्यवस्था ही मुलांवर ‘त्यांचा देश चांगला नाही’, हे बिंबवत असल्याचे जाणवते.’’ यावर सदगुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘सध्याचा सुशिक्षित वर्ग साधी टूथपेस्ट कोणती घ्यायची ? तेही विज्ञापन पाहून ठरवतो. यातूनच त्यांंची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते.’’
दैनिक ‘समाचार नया पत्रिका’चे ज्येष्ठ संपादक श्री. परशुराम काफ्ले यांच्याशी भेट
दैनिक ‘समाचार नया पत्रिका’चे ज्येष्ठ संपादक श्री. परशुराम काफ्ले यांची सदगुरु डॉ. पिंगळे यांनी भेट घेतली. या वेळी श्री. काफ्ले म्हणाले, ‘‘एवढी वर्षे तुम्ही येणार्या आपत्काळाविषयी सांगायचे. तेव्हा मला वाटायचे की, आता तर सर्व ठीक आहे, हे कसे शक्य आहे ? पण कोरोना महामारी आल्यावर तुमचे सत्य असल्याचे समजले.’’ या वेळी काफ्ले यांनी यांनी पंकज घिमिरे आणि ‘कांतीपूर मिडिया’चे मनोज बस्नेत यांचीही सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्याशी भेट घडवून आणली.
ज्या कर्माने देहबुद्धी नष्ट होऊन साधक आत्मबुद्धित स्थिर होतो, तो कर्मयोग ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी कृष्ण प्रसाद शेडाय यांच्याशी आध्यात्मिक विषयावर चर्चा झाली. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘गुरु माझ्यासमवेत निरंतर आहेत, असे ज्याला वाटते, तो शिष्य आणि देव माझ्या समवेत निरंतर आहे, असे ज्याला वाटते तो भक्त. ज्या कर्माने देहबुद्धी नष्ट होऊन साधक आत्मबुद्धीत स्थिर होतो, तो कर्मयोग; पण हे अखंड झाले पाहिजे. या अनुभूतीसाठी गुरूंची आवश्यकता आहे.’’
श्री पशुपतीनाथ मंदिराचे मूल भट्ट श्री. गणेश रावल यांचे आशीर्वाद
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी श्री पशुपतीनाथ मंदिराचे मूल भट्ट श्री. गणेश रावल यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी सध्या चालू असेलेले हिंदु जनजागृती समितीचे कार्य, हलाल जिहाद आदींविषयी सविस्तर जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी पशुपतीनाथांचे प्रसादरूपी चंदन आणि रुद्राक्षाची माळ घालून आशीर्वाद दिले.
‘स्पिरिचुअल टूर्स’ आस्थापनाचे मालक प्रा. भरत शर्मा यांची घेतली भेट !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘स्पिरिचुअल टूर्स’ आस्थापनाचे मालक प्रा. भरत शर्मा यांची भेट घेतली. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘स्वार्थ, सत्ता, स्त्री, अहंकार आणि धन हे समाजाच्या विभाजनाचे कारण आहे. राजकारणी त्याचा लाभ घेऊन लोकांना विभाजित करतात. समाज साधना करण्याचे सोडून स्वार्थामध्ये लिप्त होतो, तेव्हा समाजात असुर वाढतात.’’
‘ओंकार टिव्ही’ दूरचित्रवाहिनीवर ‘श्राद्ध’ विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन
पितरांचे छायाचित्रे लावण्याला धर्मपरंपरेचा आधार नाही ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
‘ओंकार टिव्ही’ दूरचित्रवाहिनीवर वाहिनीचे संस्थापक श्री. मुकुंद शर्मा यांनी ‘श्राद्ध’ या विषयावर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे विशेष चर्चासत्र आयोजित केले. या वेळी त्यांनी पितृपक्षाविषयी शास्त्रीय माहिती दिली. याविषयी समाजात असलेले अपसमज दूर करतांना सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘जोपर्यंत एकत्र कुटुंब आहे, वित्तकोष एक आहे आणि एका चुलीवर अन्न बनते, तोपर्यंत केवळ थोरल्या किंवा सर्वांत लहान मुलाने श्राद्ध केले, तर चालते; परंतु कुटुंब विभक्त झाल्यावर प्रत्येक मुलाने श्राद्ध करणे अपेक्षित आहे. घरात किंवा देवघरात पितरांचे छायाचित्र लावण्याला धर्मपरंपरेचा काही आधार आणि महत्त्व नाही. पितरांचे छायाचित्र लावल्याने त्यांचा लिंगदेह त्यांच्या छायाचित्राकडे आकृष्ट होतो. त्यामुळे त्यांच्या लिंगदेहाला गती मिळण्यात बाधा उत्पन्न होऊ शकते.’’
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे ज्ञानमोती१. धर्माचरण न करणे, हा एक प्रकारचा साम्यवादच आहे. |