पुणे येथे राबवण्यात येणार्या प्रकल्पांसाठी टेकडीफोड करण्यास पुणेकरांचा विरोध !
पुणे – येथील विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पुणे महापालिकेकडून बालभारती रस्ता ते पौंड रस्ता या दरम्यान टेकडीवरून मार्ग सिद्ध करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. सुतारदरा, जनवाडी आणि पंचवटी या ठिकाणी २ भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. वेताळ टेकडीवर ३ प्रकल्प राबवणार आहेत. ‘उच्चक्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गा’वर (एच्.सी.एम्.टी.आर्.) ‘निओ मेट्रो’चा हा तिसरा प्रस्ताव आहे. या तिन्ही प्रस्तावांमुळे मोठ्या प्रमाणात टेकडीफोड होणार आहे. त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला असून त्याच्या निषेधार्थ ३० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ६ वाजता जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. ‘टेकडी वाचवण्यासाठी धावा’, असे आवाहन आयोजकांनी पुणेकरांना केले होते.
(‘निओ मेट्रो’ म्हणजे रबरी टायरवर धावणारी मेट्रो ! सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्या बसच्या तुलनेत तीन ते पाचपट अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ‘निओ मेट्रो’ची आहे. या ‘मेट्रो’चे कोच विजेवर धावतात. ताशी ९० कि.मी. वेगाने ‘निओ मेट्रो’ धावू शकते. या मेट्रोला स्वतंत्र मार्गाची आवश्यकता असते.)