आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे कारण पुढे करत कोल्हापूर पोलिसांकडून जलअभियंत्यावर गुन्हा नोंद !
कोल्हापूर – ११ ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर महापालिकेतील जलअभियंता त्याच्या आईला दुचाकीवरून घेऊन जात असतांना रस्त्यातील खड्डयात पडून त्याच्या आईचा मृत्यू झाला. यानंतर महापालिकेने काहीतरी करतो, असे दाखवण्यासाठी लगेचच शहरात खड्डे भरण्याचे काम चालू केले. त्याही पुढे जाऊन आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे कारण पुढे करत कोल्हापूर पोलिसांनी त्या जलअभियंत्यावरच गुन्हा नोंद केला आहे. याविषयी कोल्हापूर शहरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष असून सर्वांनी महापालिका प्रशासनावर कोणतीच कारवाई न करता जलअभियंत्यावरच गुन्हा नोंद केल्याविषयी संताप व्यक्त केला आहे.
कोल्हापूर शहरात रस्त्यांची अक्षरश: चाळण !
कोल्हापूर शहरात रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून एकही रस्ता असा नाही, जिथे खड्डा नाही. महापालिकेने रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधी रुपये व्यय करून तो निधी कुठे गेला ? असाही प्रश्न आता नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. शहरात प्रतिदिन खड्डे असल्यामुळे कुठे ना कुठे अपघात होतच आहेत, तसेच दुचाकी-चारचाकी वाहनांची दुरवस्था होत आहे, हे वेगळेच.