पोलीस ठाण्यात ध्वनीचित्रीकरण करणे गुन्हा नाही ! – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई – पोलीस ठाण्यामध्ये (ध्वनीचित्रीकरण) ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ केल्याप्रकरणी वर्धा पोलिसांनी नोंद केलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने रहित केला आहे. ‘पोलीस ठाणे ही जागा गोपनीयता कायद्याच्या अंतर्गत (ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट) प्रतिबंधित केलेले ठिकाण नाही’, असे स्पष्ट करत याविषयीच्या याचिकेवरील सुनावणीमध्ये न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. वर्धा येथील रहिवासी रवींद्र उपाध्याय हे वर्ष २०१८ मध्ये पत्नीसह वर्धा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यास गेले होते. त्यांनी तक्रार प्रविष्ट करतांनाचे ध्वनीचित्रीकरण केले. त्यामुळे पोलिसांनी उपाध्याय यांच्याविरुद्ध गोपनीयता कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा नोंद केला. त्यानंतर पोलिसांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही प्रविष्ट केले. हा गुन्हा रहित करण्यासाठी उपाध्याय यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने वरील निर्णय दिला.