प्रकल्पांची माहिती देण्यासाठी सरकार श्वेतपत्रिका काढणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ठाणे – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता एअरबस टाटा यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा प्रकल्पही गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे. याला उत्तर म्हणून आता शिंदे-फडणवीस सरकारकडून वेदांता फॉक्सकॉन, एअरबस टाटा यांसह इतर प्रकल्पांची माहिती देण्यासाठी लवकरच श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात २९ ऑक्टोबर या दिवशी उदय सामंत यांची पत्रकार परिषद पार पडली. या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले…
१. सध्याच्या राज्य सरकारला दोष देण्यापेक्षा मागील अडीच वर्षे तत्कालीन सरकारकडून हे प्रकल्प राज्यात टिकवण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले ? याची सविस्तर माहिती जनतेसमोर येणे महत्त्वाचे आहे.
२. ‘टाटा एअरबस प्रकल्पाविषयी तत्कालीन सरकारची सकारात्मक चर्चा झाली होती’, असे सांगण्यात येत आहे; मात्र अशी कोणतीच चर्चा झाली नाही. त्याविषयी कोणत्याच विभागाकडे कोणतेही कागदपत्र नाही. टाटा एअरबसला तत्कालीन महाराष्ट्र शासनाने आणि उद्योग विभागाने कधीही पाचारण केलेले नाही.
३. ‘टाटा एअरबस’ प्रकल्पासाठी यापूर्वीच्या सरकारने कोणतेही प्रयत्न केले असतील, तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत.
४. वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग्ज प्रकल्प, मेडिकल डिव्हाईस यांसह फूडपार्क यांसारख्या मोठ्या प्रकल्पांविषयीची माहिती सर्वांसमोर यावी, तसेच यांतील काही प्रकल्प इतर राज्यात का गेले ? याची कारणे सर्वांसमोर यावीत, यासाठी राज्य शासनाच्या वतीने लवकरच श्वेतपत्रिका काढण्यात येईल. याद्वारे सर्व प्रकल्पांचे इतिवृत्त मांडण्यात येणार आहे.