‘सॅफ्रन’ आस्थापनाचा प्रकल्प भाग्यनगर येथे गेला !
राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका
मुंबई – भूमी मिळवण्यास प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा ‘सॅफ्रन’ आस्थापनाचा प्रकल्प भाग्यनगर येथे गेल्याचे समजते. या प्रकल्पामुळे ५०० ते ६०० कामगारांना रोजगार मिळणार होता. याआधी ‘वेदांता फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा एअरबस’ हे प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेले. ‘सॅफ्रन ग्रुप’ मिहानमध्ये ११८५ कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक होता. विमान आणि रॉकेटचे इंजिन बनवणारे हे आस्थापन होते.
‘सॅफ्रन’ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.
राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि ढासळलेली प्रशासकीय व्यवस्था, हे महाराष्ट्राचे अपयश ! – आदित्य ठाकरे
मुंबई – ‘कृषी आणि उद्योग या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरील विश्वास उडाला आहे. गुंतवणूकदारांचा राजकीय स्थिरतेवरील आणि शेतकर्यांचा नैसर्गिक संकटकाळात सरकार साहाय्य करेल, यावरील विश्वास उडाला आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि ढासळलेली प्रशासकीय व्यवस्था, हे महाराष्ट्राचे अपयश आहे’, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ‘सॅफ्रन’ प्रकल्प राज्याबाहेर जाण्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे.
(सौजन्य : ABP MAJHA)
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची टीका
‘एखादी कंपनी राज्याबाहेर जात असेल, तर आपण समजू शकतो; मात्र हे सातत्याने होत आहे. यावरून शिंदे-फडणवीस हे सरकार चालवण्याच्या लायक नसल्याचे सिद्ध झाले असून त्यांनी राजीनामा द्यावा’, अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.