सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांचा देहत्याग
रामनाथी (गोवा) – नम्रता, निरपेक्ष प्रीती यांसारखे अनेक दैवी गुण असलेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्य भाव असलेले, तसेच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांनी ३० ऑक्टोबर २०२२ ला दुपारी ४.२७ वाजता दीर्घ आजारामुळे देहत्याग केला. त्यांच्या पश्चात २ मुलगे आणि १ मुलगी, असा परिवार आहे. त्यांची मुलगी कु. दीपाली होनप आणि धाकटा मुलगा श्री. राम होनप हे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करतात, तर मोठा मुलगा श्री. सुरेंद्र होनप हेही नाशिक येथे साधनारत असतात. पू. होनपकाका यांच्या पत्नी पू. (कै.) सौ. निर्मला होनप या सनातनच्या २९ व्या संत आहेत.
पू. होनपकाका हे मूळचे नाशिक येथील होते. ते ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्यासी जोडा’ ही सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणून सदा हसतमुख रहात. सर्व साधकांवर त्यांनी सदोदित प्रीतीचा वर्षाव केला.
अफाट सहनशीलता आणि देवावरील दृढ श्रद्धा यांमुळे गंभीर आजारपणाला स्थिरतेने सामोरे जाणारे सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) !
‘मूळचे नाशिक येथील पू. पद्माकर होनप यांचा वर्ष १९९८ मध्ये सनातन संस्थेशी संपर्क झाला. त्यानंतर त्यांनी लगेच सेवा आणि साधना यांना आरंभ केला. वर्ष २००६ मध्ये होनप दांपत्य पूर्णवेळ साधना करण्यासाठी नाशिकहून रामनाथी आश्रमात आले. आश्रमात आल्यापासून पू. पद्माकर होनप यांनी सतत साधनारत रहाण्याचा प्रयत्न केला. ते प्रत्येक सेवा भावपूर्ण करत असत. ११.६.२०११ या दिवशी पू. पद्माकर होनप यांना सनातनचे ७ वे संत म्हणून घोषित करण्यात आले. १२.८.२०१० या दिवशी त्यांच्या पत्नी सौ. निर्मला होनप यांनी देहत्याग केला. त्यांच्या मृत्यूनंतरही पू. पद्माकर होनप हे स्थिर राहून आणि दृढ श्रद्धेने साधनारत राहिले. पू. (कै.) सौ. निर्मला होनप यांच्या साधनेमुळे त्यांना मृत्यूनंतर वर्ष २०१३ मध्ये संत झाल्याचे घोषित करण्यात आले.
होनप दांपत्याच्या चांगल्या संस्कारामुळे त्यांची मुलगी सुश्री (कु.) दीपाली होनप आणि मुलगा श्री. राम होनप हे दोघेही सनातनच्या रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहेत.
वर्ष २०१८ मध्ये पू. पद्माकर होनप यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. वयोमानाप्रमाणे त्यांच्या खुब्याचे (कंबर आणि मांडी जोडणार्या सांध्याचे) हाड झिजले असल्याने त्यांना तीव्र वेदना असत. एवढ्या असह्य वेदना होत असूनही पू. होनपकाका साधकांसाठी न कंटाळता नामजपादी उपाय करत.
कर्करोगामुळे ३०.१०.२०२२ या दिवशी दुपारी ४.२७ वाजता पू. पद्माकर होनप यांनी देहत्याग केला. त्यांच्यातील नम्रता, शरणागतभाव, प्रेमभाव, सेवाभाव आणि अहं अल्प असणे, या गुणांचे सर्वांनाच दर्शन झाले. अफाट सहनशीलता आणि देवावरील दृढ श्रद्धा यांमुळे पू. होनप यांनी दुर्धर आजारपणाला धैर्याने तोंड दिले.
‘(कै.) पू. पद्माकर होनप यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती होवो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (३०.१०.२०२२)