भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणार्या व्यक्तींवर २०० रुपये दंड आकारण्यात येईल !
नागपूर महापालिकेचे परिपत्रक !
नागपूर – मोकाट सुटलेल्या भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालतांना आढळल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास कुत्र्यांना खाऊ घालणार्यांवर कारवाई करण्याचे परिपत्रक नागपूर महापालिकेकडून काढण्यात आले आहे. ‘कुत्र्यांना खाऊ घालणार्या व्यक्तींवर २०० रुपये दंड आकारण्यात येईल’, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रविष्ट झालेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.
सार्वजनिक ठिकाणी कुठलीही व्यक्ती भटक्या कुत्र्यांना खाऊ घालतांना आढळल्यास तिचे छायाचित्र काढून महापालिकेच्या सामाजिक संकेतस्थळाच्या खात्यावर पाठवावे. त्याची नोंद घेण्यात येऊन संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी केले आहे.