नवी मुंबईत पाणीटंचाई निर्माण करणार्या अधिकार्यांना घेराव घालणार ! – गणेश नाईक, आमदार
नवी मुंबई – कुणाच्या तरी राजकीय दबावाखाली येऊन नवी मुंबई शहरामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणार्या महापालिकेच्या काही स्वार्थी अधिकार्यांना घेराव घालू, अशी चेतावणी भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी दिली आहे.
नवी मुंबईतील विविध महत्त्वाच्या नागरी समस्यांवर नाईक यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत त्यांनी शहरात भेडसावणार्या पाणीटंचाईवर आक्रमक भूमिका घेतली. पाणीटंचाई निर्माण करणार्या अधिकार्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. या बैठकीला माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महापालिकेतील प्रशासकीय राजवटीच्या कालावधीपूर्वी नवी मुंबईमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत होता; परंतु प्रशासकीय कालावधीमध्ये नवी मुंबईतील गाव, गावठाण शहर आणि झोपडपट्टीचा भाग अशा सर्वच ठिकाणी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या विरोधात जनतेमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. काही अधिकारी राजकीय दबावापोटी पाणीटंचाई निर्माण करत आहेत.
काही लोकप्रतिनिधींच्या प्रभागात जाणूनबुजून अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. राजकीय असंतोष निर्माण करण्याचे कारस्थान शिजले जात आहे. आयुक्त नार्वेकर यांनी पाणी खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक घेऊन या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.