वर्ष २०१९ मध्येच युतीचे सरकार यायला हवे होते ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
नंदुरबार – गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यातील विकासकामे मंदावली होती, त्याला गती देण्याचे काम युतीचे सरकार करत आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून लोकांच्या भावना पूर्ण करण्याचे काम आम्ही करत आहोत. वर्ष २०१९ मध्येच हे युतीचे सरकार यायला हवे होते. आता काही जण बांधावर जात आहेत. त्या सर्वांना मी कामाला लावले, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. जिल्हा दौर्यावर आले असता २८ ऑक्टोबर या दिवशी एका आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, गेल्या ३-४ मासांत आपण अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यात शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. केंद्र आणि राज्य शासनाने पेट्रोल अन् डिझेल इंधनाच्या किमती अल्प केल्या आहेत; मात्र गेल्या अडीच वर्षांमध्ये ते निर्णय घेण्यात आले नाहीत; परंतु आमचे सरकार आल्यानंतर पेट्रोलमध्ये ५ आणि डिझेलमध्ये ३ रुपयांची कपात केली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकरी संकटात होते, त्यांना न्याय देण्याचे काम आम्ही केले. आतापर्यंत ‘एन्.डी.आर्.एफ्.’च्या निकषाप्रमाणे साहाय्य दिले जात होते; मात्र आपल्या सरकारने ‘एन्.डी.आर्.एफ्.’च्या दुपटीने साहाय्य करण्याचा निर्णय घेतला. २ हेक्टरऐवजी ३ हेक्टरचा निर्णय घेण्यात आला. नियमाने साहाय्य जर केली असते, तर १ सहस्र ५०० कोटी रुपये लागले असते; मात्र आम्ही ६ सहस्र कोटी रुपये दिले आहेत. नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना ५० सहस्रांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकासरकारने शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले ! |