बोलवाड-टाकळी येथील श्री गुरुदेव तपोवनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला !
मिरज, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बोलवाड-टाकळी येथील श्री गुरुदेव तपोवनात २६ ऑक्टोबरला विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. मेंदूरोगतज्ञ डॉ. अरिहंत पाटील, आदर्श विद्यार्थिनी कु. वेदिका हारगे, ‘केळकर योग वर्गा’ची राष्ट्रीय योगपटू कु. सई राजेंद्र पाटील, चित्रकलेसाठी चि. आर्यन माने, रक्तदानासाठी श्री. सुधीर स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. श्री गुरुदेव तपोवनाचे पू. शिवदेव स्वामी आणि डॉ. सोमशेखर पाटील यांच्या हस्ते हे सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी पू. शिवदेव स्वामीजी म्हणाले, ‘‘त्यांचे गुरु श्री ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या इच्छेनुसारच प्रतिवर्षी सत्मार्गाकडे वळवण्यासाठी आणि समाजाला स्फूर्ती मिळावी, यासाठी हा सत्कार समारंभ करण्यात येतो. केळकर योगवर्गाच्या माध्यमातून योगपटू घडवण्यासाठी योगशिक्षक श्री. दीपक दुर्गाडे यांचे प्रयत्न अतिशय स्तुत्य आहेत.’’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता सचिन हांडीफोड यांनी केले. या कार्यक्रमात मिरज येथील केळकर योगवर्गाच्या योगपटूंनी योगासने सादर केली. कार्यक्रमाची सांगता आरती आणि महाप्रसाद यांनी झाली. या कार्यक्रमासाठी टाकळी, मिरज, सांगली आणि कागवाड परिसरांतील अनेक जण उपस्थित होते.