समाजाला शुद्ध आध्यात्मिक साधनेची शिकवण देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘सद्य:स्थितीत फारच थोडे संत आहेत, जे समाजाला आध्यात्मिक साधना शिकवतात. अनेक संप्रदाय आधिदैविक उपासना करण्यास शिकवतात. आधिदैविक आणि आध्यात्मिक साधनेतील भेद पुढे दिला आहे.
१. आधिदैविक साधना
यज्ञकर्म, देवतांची उपासना, मंत्रजप, अनुष्ठाने आदी आधिदैविक स्वरूपाच्या साधना आहेत. या साधना सूक्ष्म ऊर्जेशी संबंधित आहेत. वैदिक परिभाषेत या सूक्ष्म ऊर्जांना ‘देवता’ म्हटले आहे. आधिदैविक साधना अधिकतर सकाम असून त्या यश, बल, बुद्धी, सिद्धी आदी इच्छित गोष्टी प्राप्त करून देतात; पण केवळ आधिदैविक साधनाच जीवनभर करत राहिल्यास त्यांची आध्यात्मिक प्रगती होत नाही.
२. आध्यात्मिक साधना
मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांच्या लयासाठी प्रयत्न करणे म्हणजे आध्यात्मिक साधना. आत्म्याला त्याच्या स्व-स्वरूपाची जाणीव करून देणे, हेच आध्यात्मिक साधनेचे उद्दिष्ट आहे. ज्ञान, भक्ती, कर्म, ध्यान आदी साधनामार्ग त्याअंतर्गत येतात. आध्यात्मिक साधनेमुळे मनुष्याला चिरंतन सुखाची (आनंदाची) प्राप्ती होते. जन्म-मृत्यूच्या चक्रांतून तो कायमचा मुक्त होतो.
३. सप्तर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही त्रिगुणातीत परमेश्वराची उपाधी देऊन त्यांचा गौरव करणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘सनातन संस्थे’ची स्थापना समाजाला योग्य आध्यात्मिक साधना शिकवण्यासाठीच केली. विहंगम गतीने आध्यात्मिक उन्नती साध्य होण्यासाठी त्यांनी ‘गुरुकृपायोग’ विशद केला. चित्तात साठलेले जन्मोजन्मीचे स्वभावदोषांचे संस्कार पुसण्यासाठी ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ सांगितली. बुद्धीलय होण्यासाठी प्रत्येक गोष्ट विचारून करण्याचे महत्त्व बिंबवले. कोणत्याही एकाच साधनामार्गाचे अनुसरण न करता सर्व साधनामार्गांचा समन्वय साधला. गुरूंच्या देहापेक्षा गुरुतत्त्वाची सेवा करण्यास शिकवले. त्यामुळे सनातनची साधना निर्गुण, निरपेक्ष, आकाशतत्त्वाची आणि आत्मतत्त्वाशी संबंधित आहे. त्यामुळेच सप्तर्षींनी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही त्रिगुणातीत परमेश्वराची उपाधी दिली. अज्ञानमय कलियुगात ज्यांनी आध्यात्मिक साधनेचे मर्म जाणले आणि ते लोकांना शिकवले, अशा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.(२१.१०.२०२२)
|