संतांनी साधनेविषयी केलेल्या अनमोल मार्गदर्शनानंतर त्यांना ‘धन्यवाद’ (थँक यू) न म्हणता ‘कृतज्ञता’ म्हणा !
‘व्यवहारामध्ये कुणी कोणत्याही प्रकारचे साहाय्य केले, तर आपण त्यांना ‘धन्यवाद’ म्हणतो. व्यवहारामध्ये ‘धन्यवाद’ हा शब्द सर्रास वापरला जातो; पण अध्यात्मात ‘धन्यवाद’ असे न म्हणता ‘कृतज्ञता’, असे म्हटले जाते. एकदा काही युवकांनी एका संतांना साधनेविषयीचे प्रश्न विचारले. संतांनी शंकानिरसन केल्यावर युवकांनी त्या संतांना ‘धन्यवाद’ म्हटले. संत हे ईश्वराचे सगुण रूप असून त्यांना ‘धन्यवाद’ म्हणण्यापेक्षा त्यांच्याप्रती कृतज्ञताच व्यक्त करायला हवी; कारण संतांनी दिलेले ज्ञान अनमोल आणि अमूल्य असते. त्यासाठी कितीही वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच असते.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०२२)
साधकांनो, कलियुगातील भगवद्गीतेसम असलेल्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’चे वाचन आणि अभ्यास नियमितपणे करा !
‘बर्याच साधकांकडून ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचन होत नसल्याचे लक्षात येते. अशा साधकांनी ‘आपल्यामध्ये शिकण्याच्या वृत्तीचा अभाव आहे’, हे लक्षात घ्यावे आणि ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. या नियतकालिकांच्या माध्यमातून राष्ट्र, धर्म, तसेच अध्यात्म यांविषयी अमूल्य मार्गदर्शन मिळते. त्यामुळे साधकांनी ‘सनातन प्रभात’चे वाचन आणि अभ्यास यासाठी नियमितपणे वेळ देणे अपेक्षित आहे.
सेवांच्या व्यस्ततेमुळे संपूर्ण नियतकालिकाचे वाचन करणे शक्य नसेल, तर राष्ट्र आणि धर्म यांवर आघात करणार्या घटना, साधना अन् गुरुसेवा यांसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना, संतांचे मार्गदर्शनपर लेख आदी सदरे प्राधान्याने वाचावीत. इतर सदरे वेळेच्या उपलब्धतेनुसार वाचता येतील. समष्टी सेवा करणार्या साधकांना ‘प्रतिदिन समाजात काय घडामोडी घडतात ?’, ते ठाऊक असणे आवश्यक आहे. या दृष्टीने त्यांनी नियमितपणे अंकवाचन करणे अपरिहार्य आहे.
‘साधकहो, श्री गुरूंचे चैतन्यदायी वार्तापत्र असलेले नियतकालिक ‘सनातन प्रभात’ नियमित वाचून आणि त्यातील शिकवणीनुसार आचरण करून गुरुकृपा संपादन करा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)