पातूर (जिल्हा अकोला) येथे मृत युवकाला जिवंत केल्याचा बनाव पोलिसांनी हाणून पाडला !
अकोला – जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा गावातील मृत युवकाला जिवंत करून गावकर्यांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. २६ ऑक्टोबरच्या सायंकाळी प्रशांत मेसरे या युवकाचा अंत्यसंस्कार होत असतांनाच तो तिरडीवर उठून बसला होता; मात्र हा केवळ भोंदूगिरीचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत झाल्याचा बनाव करणारा युवक प्रशांत मेसरे याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. पोलीस ठाण्यात त्याची आरोग्य पडताळणी केली असता युवक निरोगी आढळून आला आहे. आता हा प्रकार युवकाच्या कुटुंबियांनी का केला ? याचा पोलीस शोध घेत आहेत. विवरा येथील होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या प्रशांत मेसरे याला दातखिळी येण्याचा आजार आहे. उपचारासाठी त्याला कुटुंबियांनी खामगाव येथील आधुनिक वैद्यांकडे नेले होते.
प्राथमिक पडताळणी आणि उपचार केल्यानंतर आधुनिक वैद्यांनी काही चाचणी करण्यास सांगितले. त्यानंतर प्रशांत याला अकोला येथे उपचारासाठी नेत असल्याचे कुटुंबियांनी सांगितले; मात्र त्याला अकोला येथे उपचारासाठी न नेता गावातील मांत्रिक दीपक बोरले यांच्याकडे आणण्यात आले. मंत्र उपचारानंतर काही कालावधीतच तिरडीवरील मयत प्रशांत उठून बसला. या वेळी अंतिम संस्काराला आलेले नातेवाईक आणि गावकरी चकीत झाले. हा सगळाच प्रकार बनावट असल्याचे प्रथमदर्शनी आढळून येते, असे पोलीस निरीक्षक योगेश वाघमारे यांनी सांगितले. त्यासमवेत गावचे माजी उपसरपंच अमर पजई, सरपंच माणिक देठे आणि हरिभाऊ इंगोले यांनीही प्रकाराविषयी संशय व्यक्त केला आहे.