पालघर येथील शासकीय कामांचा निधी लाटल्याप्रकरणी १० अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
मुंबई – पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात सामाजिक वनविभागाच्या अंतर्गत संमत करण्यात आल्याची कामे झाली नसतांना ती झाल्याची खोटी कागदपत्रे जोडून ७८ कोटी १७ लाख रुपयांचा निधी लाटण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामध्ये तत्कालीन मुख्य वनसंरक्षक, वनसंरक्षक, विभागीय वन अधिकारी, लागवड अधिकारी, वनपाल, रोपवन कोतवाल आदी अधिकारी आणि कर्मचारी आदी १० जणांवर जव्हार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते इमरान पठाण यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीतून हा प्रकार उघड झाला. सामाजिक वनविभागाच्या एका अधिकार्याने या प्रकरणी तक्रार केली आहे. वर्ष २०१५ ते २०१८ या कालावधीत ७४ गावांमध्ये ८९९ कामे झाल्याचे दाखवून देयके देण्यात आली. काही नागरिकांनी तक्रार प्रविष्ट केल्यावर अन्वेषणात यांतील एकही काम झाले नसल्याचे उघड झाल्याची माहिती पालघर पोलिसांकडून देण्यात आली. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अन्वेषण चालू असल्याचे सांगितले.
संपादकीय भूमिकाकामे झालेली नसतांना कोट्यवधींचा निधी लाटणार्या प्रशासकीय अधिकार्यांकडून तो पैसा वसूल करून घ्यावा ! |