सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच महापालिकांच्या निवडणुका होणार !
मुंबई – राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या आगामी निवडणुकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग यासंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ‘या निवडणुका जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही’, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका यांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार चालू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्यशासन जानेवारी मासात या निवडणुका घेणार आहे, असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे’, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.