‘राष्ट्रीय प्रसिद्धी शिबिरा’त आलेल्या अडचणी आणि त्यांवर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर अडचणी दूर होणे
‘१४ ते १६ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमामध्ये ‘राष्ट्रीय प्रसिद्धी शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला ज्या काही अडचणी आल्या, त्यांवर मात करण्यासाठी सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी नामजपादी उपाय सांगितले. याबाबतचा वृतांत सोबत दिला आहे.
१. ‘प्रसिद्धी शिबिरा’ला येण्यासाठी काही शिबिरार्थींना आलेल्या अडचणी
‘प्रसिद्धी शिबिरा’ला येण्यासाठी काही शिबिरार्थींना ‘शिबिराला जाण्यास घरून विरोध होणे, चाकरी (नोकरी) करत असलेल्या आस्थापनातून सुट्टी न मिळणे, वैयक्तिक अडचणी येणे’, अशा अडचणी येत होत्या.
१ अ. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय
१ अ १. जप : महाशून्य
१ अ २. न्यास : उजव्या हाताचा तळवा बंद डोळ्यांसमोर १ – २ सेंटिमीटर अंतरावर धरावा.
१ अ ३. कालावधी : २ घंटे
१ आ. उपायांमुळे बर्याच साधकांच्या अडचणी दूर होणे : ज्या साधकांना अडचणी येत होत्या, त्यांना हे उपाय करण्यास सांगितले होते. या उपायांमुळे बर्याच साधकांच्या अडचणी दूर होऊन ते शिबिरासाठी येऊ शकले.
२. ‘ऑनलाईन’ जोडलेल्या साधकांना शिबिरातील मार्गदर्शन ऐकू न येणे, तेव्हा ‘ऑडिओ सेटअप’च्या यंत्रणेवर दक्षिण दिशेकडून त्रासदायक (काळी) शक्ती येत असल्याने ती अडचण आली असल्याचे सद्गुरु डॉ. गाडगीळ यांना सूक्ष्मातून कळणे आणि नामजपादी उपाय केल्यावर ती अडचण १५ मिनिटांत दूर होणे
काही साधक शिबिरामध्ये ‘ऑनलाईन’ जोडले जाणार होते. त्यांना शिबिरातील मार्गदर्शन ‘ऑनलाईन’ ऐकवले जाणार होते, तसेच तेही शिबिरात बोलू शकणार होते. त्यामुळे ‘ऑडिओ सेटअप’ व्यवस्थित चालू आहे ना आणि आवाज ऐकू येत आहे ना ?’, याची चाचणी १३ ऑक्टोबर या शिबिराच्या आदल्या दिवशी करण्यात आली होती. असे असूनही १४ ऑक्टोबर या शिबिराच्या पहिल्या दिवशी ‘ऑनलाईन’ जोडलेल्या साधकांना शिबिरातील मार्गदर्शन ऐकू येत नव्हते, तसेच त्या साधकांचा आवाजही शिबिरात ऐकू येत नव्हता. संगणक तंत्रज्ञान माहीत असणार्या साधकांनाही ही अडचण सुटत नव्हती. त्यामुळे ही अडचण संगणकीय नसून आध्यात्मिक स्वरूपाची असल्याचे लक्षात आले; म्हणून याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘ऑडिओ सेटअप’च्या यंत्रणेवर दक्षिण दिशेकडून त्रासदायक शक्ती येत आहे. यावर मी नामजप करतो, तसेच तुम्हीही ‘ऑडिओ सेटअप’च्या पुढे २ रिकामे खोके त्यांची उघडी तोंडे दक्षिण दिशेकडे तोंड करून लावा आणि त्या दिशेने विभूतीही फुंका.’’ त्यानुसार आम्ही खोके लावले. विभूती फुंकरण्याची सेवा शिबिरात सहभागी झालेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका कु. प्रभावती यांनी केली. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनीही ‘महाशून्य’ हा नामजप केला. त्यानंतर १५ मिनिटांनी अडचण सुटून ‘ऑनलाईन’ जोडलेल्या साधकांना शिबिरातील मार्गदर्शन ऐकू येऊ लागले, तसेच त्यांना शिबिरातही सहभागी होता आले.
३. त्यानंतर १६ ऑक्टोबरपर्यंत चाललेले ‘राष्ट्रीय प्रसिद्धी शिबिर’ कोणतीही अडचण न येता निर्विघ्नपणे पार पडले.’
– श्री. अरुण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१०.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |