उबेर इंडिया आस्थापनाला २० सहस्र रुपये देण्याचे आदेश !
विमानतळावर पोचण्यास विलंब झाल्याचे प्रकरण
मुंबईतील ग्राहक न्यायालयाचा निर्णय !
डोंबिवली – एका महिलेला विमानतळावर पोचण्यास विलंब झाल्याने उबेर इंडिया आस्थापनाला २० सहस्र रुपये देण्याचे आदेश मुंबईतील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.
१. डोंबिवली येथील अधिवक्त्या कविता शर्मा यांना १२ जून २०१८ या दिवशी सायंकाळी ५.५० वाजताच्या विमानाने चेन्नईला जायचे होते. त्यांनी उबर कॅब नोंदवली.
२. याच कालावधीत कविता सातत्याने कॅब चालकाला संपर्क साधत होत्या; पण त्याचा भ्रमणभाष व्यस्त येत होता. १४ मिनिटानंतर कॅब त्यांच्याजवळ पोचली. कॅब चालक विलंबाने आल्याने कविता यांना विमानतळावर पोचण्यासाठी १५ मिनिटे विलंब झाला आणि त्यांचे विमान हुकले.
३. कॅब चालकाने कविता यांच्याकडून अधिक भाडे वसूल केले होते. कॅब नोंदणीच्या वेळी त्यांना ५६३ रुपये इतके भाडे दाखवण्यात आले होते; पण प्रत्यक्षात विमानतळावर पोचल्यानंतर हे भाडे ७०३ रुपये झाले.
४. कविता यांनी केलेल्या तक्रारीवर उबेर आस्थापनाने त्यांना अतिरिक्त पैसे पुन्हा दिले; मात्र कायदेशीर नोटिशीला उत्तर दिले नाही.
५. कविता यांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितल्यावर ४ वर्षांनी निकाल सुनावण्यात आला. झालेल्या प्रकाराविषयी ग्राहक न्यायालयाने उबेर इंडियाला फटकारले. ‘ग्राहकाला वेळेत इच्छित स्थळी पोचवणे आणि योग्य भाडे आकारणी करणे हे उबेरचे दायित्व आहे’, असे न्यायालयाने म्हटले.
६. ग्राहक न्यायालयाने वेळेवर विमानतळावर न पोचल्यामुळे झालेल्या मनस्तापासाठी १० सहस्र रुपये आणि खटला प्रविष्ट केल्याने झालेल्या त्रासासाठी १० सहस्र रुपये अशी एकूण २० सहस्र रुपयांची हानीभरपाई देण्याचे आदेश दिले.